Breaking News

तनपुरे कारखान्याने केले ६ कोटी पेमेंट वर्ग : पाटील


राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१७-१८ च्या गळित हंगामातील मार्च महिन्यातील दुसऱ्या पंधरवाडयात गाळप झालेल्या सर्व ऊसाचे सुमारे ६ कोटी ३७ लाख रुपयांचे पेमेंट सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, शेतकरी ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेता तालुक्याची कामधेनू तनपुरे कारखाना सुरु होणे ही काळाची गरज होती. याबाबतीत जिल्ह्याचे युवा नेते व कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे यांनी अथक प्रयत्नातून कारखाना सुरु केला. संचालक मंडळास कामगारांनी व ऊस उत्पादक सभासदांनी केलेल्या मदतीमुळे अनेक संकटांना सामोरे जात या कारखान्याने २ लाख गाळपाचे उद्दिष्ट पार केले. त्यामुळे यावर्षी अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न सोडला गेला. कारखाना बंद असता तर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया संकटाला सामोरे जावे लागले असते. डॉ. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने सचोटीने कारभार करत आत्तापर्यंत गाळप केलेल्या सर्वच ऊसाचे २ हजार रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे पेमेंट अदा केलेले आहे. यात साखरेचे भाव अचानक कोसळल्याने पुन्हा एकदा आर्थिक संकट समोर आले आहे. मात्र तरीदेखील कारखान्याच्या सन २०१७-१८ च्या गळित हंगामातील मार्च महिन्यातील दि. १६ मार्च २०१८ ते दि. ३१ मार्च २०१८ या दुसऱ्या पंधरवाडयात गळीत झालेल्या सर्व ऊसाचे सुमारे ६ कोटी ३७ लाख रुपयांचे पेमेंट सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करुन दाखवत आहोत.