Breaking News

दखल - शेतकर्‍यांनीच आता भाजपला धडा शिकवावा

भारतीय जनता पक्षाच्या काळात शेतीची अवस्था काय झाली, हे वेगळं सांगायला नको. शेतीतलं किती कळतं, यापेक्षा शेतकर्‍यांसाठी प्रामाणिकपणे काही करायची इच्छा आहे, की नाही, हा खरा प्रश्‍न आहे. शेतकर्‍यांच्या पिकांना गेल्या खरीप हंगामापासून दीडपट भाव द्यायला सुरुवात करण्यात आल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंक ल्पीय भाषणात सांगितलं; परंतु शेतकर्‍यांना ठरवून दिलेला हमीभाव जिथं मिळत नाही, तिथं दीडपट भावाची अपेक्षा करणं चुकीचं आहे.
....................................................................................................................................................
शेतकर्‍यांंच्या शेतीमालाच्या हमीभावात गेल्या चार वर्षांत या सरकारनं कितीवाढ केली आणि प्रत्यक्षात तो त्यांना मिळाला का, याची उत्तरं सरकारनंच शोधली पाहिजेत. सरकार सांगतं एक आणि करतं भलतंं. शेतकर्‍यांना शेतात जनावरं सोडून द्यावी लागली. रागाच्या भरात पिकांत नांगर घालावा लागला. दूधासह अन्य शेतीमाल फुकट घेऊन जा, असं आंदोलन करावं लागतं आहे. शेतीच्या चुकलेल्या धोरणाचंच हे द्योतक आहे. साखरेपासून सर्वं वस्तूंचे दर कमी आहेत. ग्राहकांना कमी दरात देण्याच्या प्रयत्नांत शेतकर्‍यांचं नुकसान झालं, तरी चालेल, ही भूमिका घेतली जात आहे. शेतीविकासाचा डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात असलेला चार टक्के विकासदर आता एक टक्क्यावर आला. शेतीवर अजूनही 59 टक्के लोक अवलंबून असताना शेतीच्या विकासाकडं दुर्लक्ष केलं जात आहे. लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आकडे तोंडावर फेकले जात असले, तरी प्रत्यक्षात शेतीतील गुंतवणूक कमी झाली आहे. 11 लाख कोटी रुपयांचे कृषीकर्ज जाहीर केले असले, तरी आता कर्ज घ्यायला कुणीच तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतीविकासाचा दर घटल्यानं शेतमजुरांना काम नाही. शेतीवर अवलंबून असलेला घटक शहरांत स्थलांतर करायला लागला आहे.
ही परिस्थिती असताना शेतीच्या विकासाकडं गांभीर्यानं पाहण्याऐवजी 2022 पर्यंत शेतकर्‍यांचं दुप्पट करण्याचं आश्‍वासन तोंडावर फेकून सरकार मोकळं होत आहे; परंतु ते कसं वाढवायचं हे सरकार सांगायला तयार नाही. एकतर हे उद्दिष्ठ गाठायचं असेल, तर शेतीच्या विकासाचा दर दहा टक्क्यांच्या पुढं जायला हवा. तो सध्या एक टक्का आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला दुप्पट भाव मिळायला हवा किंवा भाव हाच ठेवून एकरी उत्पादकता दुप्पट व्हायला हवी. यापैकी सरकार नेमकं काय करणार, हे सांगायला तयार नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. शेतीचं कर्ज माफ केलं म्हणजे झालं, अशी मानसिकता तयार झाली आहे. शेतीचं कर्ज आतापर्यंत तीन वेळा माफ करूनही आत्महत्या थांबायला तयार नाहीत. हे लक्षात घेतलं, शेतीचे प्रश्‍न वेगळे आणि उपाय दुसरीकडेच अशी स्थिती झालेली दिसते. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं शेतक र्‍यांच्या मागण्या संपायला तयार नाही. शेतकर्‍यांच्या सर्वंच मागण्या मान्य करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती असली, तरी विश्‍वासात घेऊन जेवढ्या मागण्या पूर्ण करता येतील, तेवढ्या पूर्ण करता येणं शक्य आहे. समजा कोणत्याही मागण्या पूर्ण करता येत नसतील, तर नका करू; परंतु शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करू नका, ही अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. शेतकर्‍यांच्या मागण्या संपायला तयार नाही. त्यांचं रडगाणं सुरूच आहे. त्यामुळं शेतकरी असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक र्‍यांना साले म्हणून शिवी दिली होती. रडतात साले असं ते म्हणाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकांतही याच शेतकर्‍यांनी भाजपची साथ सोडली नाही, त्यामुळं या पक्षाच्या नेत्यांचा उद्दामपणा वाढत गेला. उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांनी विधानसभेसमोर बटाटा फेक आंदोलन केलं, तर ते शेतकर्‍यांनी नव्हे, तर भाडोत्री शेतकर्‍यांनी केलं, असं सांगण्यापर्यंत मजल गेली. शेतकर्‍यांना गृहीत धरण्याचाच हा प्रयत्न म्हणावा लागेल. शेतीमालाच्या भावाबाबत सध्या शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. अशा वेळी तरी त्यांच्या भावना दुःखावतील असं काहीही करता कामा नये.
दानवे यांनी शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळलं. आता मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्यानं शेतकर्‍यांविषयी असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. भाजपचे नेते हकम सिंह अनजानांच्या मते शेतकरी अप्रामाणिक असतात आणि त्यांना चपलेनं मारायला हवं. अनजानांचा शेतकर्‍यांचा अपमान करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत अनजाना शेतकर्‍यांवर चिडलेले असून शेतकर्‍यांना मारहाण करण्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर अनजाना यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी म्हटलं की, मध्य प्रदेश सरकार शेतकर्‍यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. मात्र, शेतकरी तरीही सरकारवर नाराज आहेत. सध्याच्या काळात शेतकरी सगळ्यात बेईमान जात आहे. सध्या शेतकर्‍यांएवढं बेईमान कोणीच नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकर्‍यांसाठी जेवढं केलं तेवढं आजवर झालेल्या इतर मुख्यमंत्री आणि सरकारनं केलेलं नाही, तसंच कोणी करणारही नाही.’ सरकारनं शेतकर्‍यांसाठी काय केलं, हे सांगणं वेगळं आणि शेतकरयंना बेईमान ठरविणं त्यांची जात काढणं वेगळं. मध्य प्रदेशची भावांतर योजना चांगली आहे. तिचं अन्य राज्यांनी अनुकरण करावं, अशी स्थिती आहे. परंतु, तरीही शेतकर्‍यांचे अन्य प्रश्‍न आहेत. मागच्या वर्षी याच काळात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं, त्यात गोळीबार होऊन सहा जणांना प्राण गमवावे लागले. असं असताना अनजाना यांनी शेतकरी कधी सुधारणार नाहीत. त्यांना चपला मारल्या पाहिजेत, असं वादग्रस्त विधान केलं. त्यांनी आपण स्वतः एक शेतकरी आहे आणि शिवराजसिंह चौहान यांच्या कामाविषयी समाधानी आहे, असं वक्तव्य केलं. शेतकरी एक जूनपासून दहा जूनपर्यंत आंदोलन करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनजाना यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळं शेतकर्‍यांमध्ये रोष असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अशा उद्दाम लोकांना धडा शिकविला पाहिजे.