Breaking News

अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या दहशतखोरीने कंत्राटदारांसह अधिकारी त्रस्त

औरंगाबाद/ विशेष प्रतिनिधी - बाहेरच्या राज्यातील मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्यासाठी अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण स्थानिक कंत्राटदारांना धमकावत ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप शासकीय नों दणीकृत कंत्राटदार संघटनेने केला आहे. या प्रक्रीयेत जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याचा दावा संघटनेने केला आहे. जिल्ह्यातील स्थानिक नोंदणीकृत कंत्राटदारांवर अतुल चव्हाण आणि कंपनीची दहशत असून भितीचे हे सावट दुर करण्याची गळ संघटनेने ना. चंद्रकांत दादा पाटील यांना घातली आहे.

औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या कार्यशैलीचा नवा आयाम शासकीय नोंदणीकृत कंत्राटदार संघटनेने चव्हाट्यावर आणल्याने अतुल चव्हाण यांचे खरे रूप उघड झाल्याची चर्चा साबांत सुरू झाली आहे.अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या नव्याने उघड झालेल्या अवगुणामुळे केवळ कंत्राटदारच दहशतीखाली वावरत आहेत, असे नाही तर अधिकारी कर्मचारीही त्रस्त झाल्याने सामुहिक रजेवर जाऊन काम बंद करण्याची मानसिकता बळावल्याचे संकेत मिळत आहेत.

यासंदर्भात साबां सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद साबांत सध्या पासष्ट कोटीच्या निविदेचे प्रकरण चर्चेत आहे. या कामाची निविदा करतांना अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सर्व नियम विशेषतः सिमिलर टाईप आफ वर्क डन या नियमाला तिलांजली देऊन बाहेरच्या राज्यात काम केलेल्या एका कंत्राटदाराला निविदा मंजूर केली. आरटीजीएस सारख्या अन्य अटी शर्तीही बासनात गुंडाळून ठेवल्या. सदर कंत्राटदार हा मुख्य कंत्राटदार नाही तर लेबर वर्कचा अनुभव असताना केवळ मर्जीतील आहे म्हणून निविदा प्रक्रीयेतून कार्यकारी अभियंत्यांनाही हेतुपुरस्सर दुर ठेवण्याची खेळी अतुल चव्हाण यांनी केली.
साबां अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर साम दंड भेद अस्र उगारतानाच जिल्ह्यातील शासकीय नोंदणीकृत कंत्राटदारावर दबाव आणून ब्लॅकमेल करीत अतुल चव्हाण स्थानिक कं त्राटदारांना निविदा भरू देण्यात अडचण निर्माण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्‍वभुमीवर शासकीय नोंदणीकृत कंत्राटदार संघटनेने अतुल चव्हाण यांच्या विरूध्द दंड थोपटले आहेत. साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना गळ घालून अतुल चव्हाण यांच्या दहशती सापळ्यातून कंत्राटदारांची सुटका करावी, असे नामदारांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे. (क्रमशः)
उद्याच्या अंकातः
अतुल चव्हाण यांच्या दहशतखोरीचा नवा आयाम