Breaking News

अग्रलेख - पोटनिवडणूकांची धामधूम !

सतराव्या लोकसभाला सामोरे जाण्यासाठी जरी एक वर्षांचा कालावधी असला, तरी त्याची तयारी आतापासूनच सुरूवात झाली असे म्हणावे लागेल. देशातील 10 राज्यातील चार लोकसभा आणि 10 विधानसभा निवडणूकांना सामौरे जात आहे. उत्तर प्रदेशमधील कैराना, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया आणि पालघर आणि नागालँड मतदारसंघात लोकसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. तर विधानसभेसाठी बिहारमधील जोकिहाट, झारखंडमधील गोमिया व सिल्ली, केरळमधील चेंगन्नूर, उत्तर प्रदेशमधील नूरपूर, उत्तराखंडमधील थराली, महाराष्ट्रात पलूस काडेगाव, मेघालयात अमपती, पंजाबमध्ये शाहकोट आणि पश्‍चिम बंगालमध्ये महेश्तला येथे पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशमधील कैराना येथे लोकसभेच्या एका जागेसाठी तर नूपूर येथे विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. गोरखपूर जागेप्रमाणेच या जागेच्या निकालावरदेखील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

या निवडणूकांतील कल ही सतराव्या लोकसभा निवडणूकांचे निकाल ठरवतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणूकांना एक वर्षांचा कालावधी असला, तरी होणार्‍या पोटनिवडणूकां या राजकीय पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. राज्यातील भंडारा-गोंदिया लोकसभेची पनोटनिवडणूक ही नाना पटोले यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यामुळे होत आहे. भंडारा आणि गोंदिया पोटनिवडणुकीकडे देखील विदर्भाचं लक्ष लागलंय. कारण भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍या नाना पटोले यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत गोंदिया-भंडारामध्ये होणार आहे. या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार असून खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुक र कुकडे आणि आणि भाजपचे हेमंत पटले यांच्या आहे. आज सकाळी सात वाजे पासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मात्र याठिकाणी काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसचा प्रचार थंडावलेला दिसून येत आहे. भंडारा-गोंदियातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे असले, तरी त्यांना निवडणून आणण्याची जवाबदारी ही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या शिरावर आहे. मात्र पटेल या पोटनिवडणूकीत तेवढे अग्रेसर दिसून येत नाही. कारण प्रफुल्ल पटेल हे निवडणूक म्हटली की, संपूर्ण तयारीने मैदानात उतरणारे नेते म्हणून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात परिचीत आहे. मात्र यावेळेस प्रफुल्ल पटेल यांनी लक्ष वेधून घेणारी कोणतीही टीका राजकीय पक्षांवर केली नाही, की लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कोणतेही उपक्रम राबविले नाही. तर दुसरीकडे भारीप बहूजन महासंघाचा उमेदवार इथे काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रससह भाजपाला चांगलाच शह देवू शकतो. भारिपचे जरी सीट निवडणून आले नाही, तरी त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे भाजप उमेदवाराला होऊ शकतो. तर दुसरीकडे पालघर लोकसभेची निवडणूकीची खरी लढत ही भाजपा-शिवसेनेमध्येच असल्याचे दिसून येत आहे. सेना आणि भाजपाने ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेचे केली आहे. या निवडणूकीमुळे भाजप-सेनेने केलेली एकमेकांवर जहरी टीका प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणूकीसाठी सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मैदानात उतरल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी यांना देखील प्रचाराच्या रिंगणात दिसून आले. एवढंच नाहीतर अखेरच्या दिवशी सेनेनं मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप बाहेर काढून एकच खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण क्लिप प्रसिद्ध करून सेनेवर पलटवार केला. एकत्र सत्तेत राहणारे दोन्ही पक्ष पालघर जिंकणार का ?, याकडे महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.