Breaking News

सातारा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान राडा

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : सातारा नगरपरिषदेने सोमवारी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांसाठी ऐनवेळी सभेची विषयपत्रिका बदलल्याचा आरोपावरून राडा झाला. नगर विकास आघाडी तसेच भाजप नगरसेवकांनी सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांना सभागृहात जाण्यापासून रोखले. दरम्यान, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना अपशब्द वापरल्याने कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन छेडले.

सातारा नगरपरिषदेत सोमवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेला सुरुवात होण्याआधीच काही नगरसेवकांच्या म्हणण्यावरून सभेची विषय पत्रिका बदलली असल्याची माहिती नगरसेवकांना मिळाली होती. त्यावरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार काही मागण्यांवर चर्चा करण्याचे साविआने आश्‍वासन दिल्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली. साविआने सर्व 18 विषय बहुमताने मंजूर केल्याने भाजप व साविआ नगरसेवकांमध्ये ऐनवेळच्या विषयांवरुन सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. याप्रसंगी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले.
या प्रकरणाची दखल घेत खा. उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येवून कर्मचार्‍यांची पाठराखण केली. त्यांनी जांभळे यांच्यावर टीकेची झोड उठवत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्याधिकार्‍यांना दिल्या. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांसमवेत पालिकेच्या कर्मचार्‍यांनी सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, सत्ताधारी साविआच्या एकाधिकारशाहीचा निषेध क रत गुरुवार पेठेतील शिर्केशाळा मैदान हे भ्रष्टाचाराचं कुरण झाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला.
सातारा नगरपरिषदेत राडा झाल्यानंतर वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांना अपशब्द वापरल्याने त्यांच्यासह पालिकेतील अधिकारी व कर्मचारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. मोठ्या प्रमाणात लवाजमा दाखल झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मुख्याधिकारी गोरे यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर गोरे यांची तक्रार घेण्यास सुरुवात करण्यात आली. तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर गर्दी वाढली होती.