Breaking News

शिक्षक बदल्यांचे आदेश धडकले! सीईओंच्या लॉगीनला याद्या; आज मिळणार ऑर्डर

बीड, (प्रतिनिधी):- तब्बल एक वर्षांपासुन प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक बदल्यांचे आदेश काल सकाळी धडकले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनला याद्या उपलब्ध झाल्या असुन सायंकाळपर्यंत अपडेट होवून आज सकाळी त्या-त्या पंचायत समितीवरुन बदलीपात्र शिक्षकांना ऑर्डर मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. बहुप्रतिक्षित आणि प्रथमच आ ॅनलाईन होत असलेल्या बदल्यांचे आदेश येऊन धडकल्याने शिक्षकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

शिक्षक बदल्यांच्या प्रश्‍नावरुन गेल्या वर्षापासुन काथ्याकुट सुरु आहे. ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्यांचे सुधारीत धोरण जाहीर करत प्रथमच ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतलेला आहे. सरल प्रणालीवर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर बदलीपात्र शिक्षकांना आदेशाची प्रतिक्षा होती. निवडणुक आचारसंहितेमुळे आतापर्यंत लांबलेल्या बदल्या केंव्हा होणार? या विषयीची उत्सुकता ताणली गेलेली असतांनाच काल सकाळी जिल्हा परिषदेत बदल्यांचे आदेश धडकले. बीड जिल्ह्यासह धुळे, बुलढाणा, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अकोला, वाशीम, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, हींगोली, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर, पुणे, अहमदनगर, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती येथील बदल्यांचे आदेश एनआयसीमार्फत संबंधित मुख्याधिकार्यांच्या लॉगीनला आले आहेत. सर्व याद्या काल सायंकाळपर्यंत अपडेट होणार असुन त्यानंतरच किती शिक्षकांच्या बदल्या झाल्या याचा आकडा समोर येणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे याद्या अपडेट होताच संबंधित पंचायत समित्यांना पाठविण्यात येणार आहेत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संबंधित बदलीपात्र शिक्षकांना त्या-त्या पंचायत समित्यांमार्फत ऑर्डर मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.