Breaking News

वर्षभरात आता केवळ चारच ग्रामसभा

रत्नागिरी, दि. 11, मे - राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता 26 जानेवारी व्यतिरिक्त राष्ट्रीय सणांच्या दिवशी ग्रामसभा होणार नाहीत. वर्षभरात केवळ चारच ग्रामसभा होणार आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात वर्षातून ग्रामसभेच्या किमान सहा सभा घेण्याची तरतूद आहे. ग्रामस्थांच्या अनुपस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने यामध्ये बदल करून सहाऐवजी किमान चार सभा घेण्याची तरतूद केली आहे. राज्य शासनाच्या इतर प्रशासकीय विभागांकडून राबविण्यात येणार्‍या महत्त्वाच्या योजनांसाठी विशेष ग्रामसभा घेतल्या जातात. त्यामुळे वर्षभरातील ग्रामसभांची संख्या वाढते.

नव्या निर्णयानुसार वित्तीय वर्षातील चारपैकी पहिली ग्रामसभा पहिल्या दोन महिन्यात, दुसरी ऑगस्टनंतर, तिसरी नोव्हेंबर महिन्यात, तर 26 जानेवारीला एक अशा 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. शासनाच्या ज्या विभागांना ग्रामसभेतील योजनांची माहिती द्यावयाची आहे, त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यां ना आगाऊ सूचना कराव्या लागणार आहेत. या चारव्यतिरिक्त एखादी ग्रामसभा कोणत्याही शासकीय विभागाला आयोजित करायची असेल, तर त्यांना ग्रामपंचायत विभागाकडे तसा प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यापूर्वी राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा घेतल्या जायच्या. या ग्रामसभेत अनेकवेळा गावातील गटतट एकमेकांची उणीदुणी काढण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे या ग्रामसभेत वादावादीचे तसेच मारामारीचे प्रकारही घडत होत. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मागवावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी यापुढे 26 जानेवारी वगळता इतर कोणत्याही राष्ट्रीय सणाच्या दिवशी सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.