Breaking News

आगामी विधानसभेत ‘मिनी आमदार’ करिष्मा करतील?

राहुरी तालुका प्रतिनिधी - तालुक्यातील ११ पैकी १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत गावाचे ‘मिनी आमदार’ निवडले गेले. बारागाव नांदूर, देसवंडी, तमनर आखाडा, ब्राम्हणी व म्हैसगाव येथे या निवडणुकीत रंगतदार चुरस निर्माण झाली. आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना राजकीयदृष्ट्या महत्व आहे. जनतेचे हे ‘मिनी आमदार’ विधानसभा निवडणुकीत करिश्मा करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. 

तालुक्यातील धामोरी खुर्द वगळता ९ ठिकाणी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान झाले. यावर्षी निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद झाली. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती झाल्या. उन्हाच्या काहिलीतही मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य चोख बजाविले. त्यामुळे सरासरी मतदानाच्या टक्केवारीने नव्वदी गाठल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखल्याने मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. ९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २५ उमेदवारांचे आणि सदस्यपदासाठी २०३ उमेदवारांनी या निवडणुकीत भवितव्य अजमविले. १० ग्रामपंचायतींपैकी धामोरी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंचपद बिनविरोध होऊन माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील व नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तनपुरे गटाच्या पारड्यात सरपंचपद टाकले गेले. यंदा या सर्व ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच थेट जनतेतूनच सरपंचपद निवडले जाणार असल्याने या पदासाठी मोठी राजकीय चुरस पहायला मिळाली. बारागाव नांदूर, म्हैसगाव, देसवंडी, तमनर आखाडा, ब्राम्हणी येथे प्रतिष्ठेच्या लढती झाल्या. त्यामुळे गावोगावच्या राजकीय वातावरण या निवडणुकांमुळे ढवळून निघाले होते. गेल्या महिनाभरापासून या गावांमध्ये निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार, राजकीय गावपुढारी, कार्यकर्त्यांनी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली होती. आपल्याच मर्जीतील उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी गावपुढार्‍यांनीही फिल्डींग लावली होेती. बारागाव नांदूरला सरपंचपदासाठी रंगतदार सामना झाला. तर वार्ड नंबर तीनमध्ये सदस्यपदासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची लढत झाली.