Breaking News

वृक्षसंवर्धनाबाबत उदासिनता चिंताजनक : तांबे


संगमनेर प्रतिनिधी - वृक्षांमुळे प्रत्येकाला स्वच्छ हवा मिळते. चांगल्या आरोग्यासाठी सर्वत्र लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी देण्याबरोबरच त्यांचे रक्षण व संवर्धन करणे महत्वाचे आहे. मात्र अलीकडे झाडे लावण्याचे फोटोसेशन होते. त्यामुळे वृक्षसंवर्धनाविषयी निर्माण होत असलेली उदासिनता मोठी चिंताजनक बाब आहे, अशी खंत नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी व्यक्त केली. 

सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत शहरात २५ उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, सुजाण नागरिकांनी वृक्षांबाबत अधिक जागरुक व्हावे. त्यांचे संवर्धन करावे. कोणी जर वृक्षांची नासधूस करीत असेल तर त्यास प्रतिकार करावा. घराजवळील परस बागेत, घरांच्या व दुकानांच्या आसपास असलेल्या वृक्षांना पाणी टाकावे.


हरित वनराईसाठी नुकसानकारक 

स्वच्छ व हरीत संगमनेर शहरासाठी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून सर्व रस्त्यांच्या दुतर्फा हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र या वृक्षांच्या संवर्धनाबाबत शहरातील नागरिकांकडून दिसणारी उदासिनता चिंताजनक बनत चालली आहे. स्वच्छ हवा, प्रदूषण मुक्तता आणि हरित वनराईसाठी नक्कीच हे नुकसानकारक आहे. - प्रा. बाबा खरात