Breaking News

अग्रलेख यंदाही मुलीचांच डंका !


भारतीय पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे स्थान केवळ चुल आणि मूल पुरतेच मर्यादेत होते. मात्र स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो त्रास सहन केला, त्याची फळे आता दिसून येत आहे. सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले वर्चस्व दाखवून दिले असुन पुरुषांपेक्षा आम्ही कमी नाही, असे महिलांच्या कर्तबगारीतून स्पष्टपणे दिसून येते. राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा, संगीत, व्यवसाय, नोकरी अशा अनेक क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. देशाच्या राष्ट्रपती ते गावाच्या सरपंच पदापर्यंत महिलांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून दिली आहे. मागील काही वर्षांपासुन दहावी-बारावीच्या निकालात मुलींनी आघाडी घेतली असुन ती यावर्षी पण टिकवून ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला यंदा 92.36 टक्के मुली बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, मुलांची टक्केवारी 85.23 इतकी आहे. विभागवार निकालात कोकण (94.85 टक्के) सर्वोत्तम ठरला आहे तर, नाशिकचा निकाल (86.13 टक्के) सर्वात कमी आहे. तर, राज्यात एकूण 88. 41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा एकूण 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुली 92.36 टक्के तर, मुलांची टक्केवारी 85.23 इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच 5379 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 4932 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एवढेच नव्हे तर सीबीएसईच्या दहावी व बारावीच्या निकालात देखील मुलीच अव्वल ठरल्या होत्या. सातत्याने दहावी व बारावीच्या परीक्षेत मुलीच प्रथम येत असुन उत्तीर्ण मुलींची संख्या ही मुलांपेक्षा अधिक आहे. स्पर्धांत्मक परीक्षेत देखील मुलींनी आपले स्थान नेहमीच अव्वल ठेवले आहे. कारण मुली अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास क रीत आहेत. मुलींना आपल्या करीअरच्या अनेक संधी दिसत असल्याने प्रचंड मेहनत घेवून त्या यश मिळवित आहेत. बारावीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळविलेल्या सर्व मुली कौतुकास पात्र असुन त्यांनी मुलांना मागे टाकले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार दिल्याने सर्व क्षेत्रे महिला काबीज करीत आहेत. आज अनेक ठिकाणी उच्च पदावर महिला विराजमान झाल्या असुन त्यांनी आपली कार्यक्षमता व बौध्दीक गुणवत्ता दाखवून दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो, अथवा केंद्रीय लोकसेवा आयोग, अथवा इतर क्षेत्र यात मुलींचा प्रभाव वाढत आहे, त्यांनी आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे आपल्या बुध्दीमत्तेने सार्‍या जगाला दाखवून दिले आहे, सैन्यासारख्या क्षेत्रात, नौदलात, सीमेवर रक्षण करण्यात, ते सर्वच क्षेत्र महिलांनी व्यापुन टाकले आहे, आपल्या कर्तबगारीने. पुरुष संस्कृतीला बाय-बाय करुन महिला राज सगळीकडेच आले आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आघाडी घेतली असुन, आजच्या महिलांच्या या यशात क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सिंहाचा वाटा आहे. महिलांमध्ये अशीच प्रगती व्हावी ही अपेक्षा असली तरी महिलांनी अंधश्रध्देपासुन दूर रहाण्याची आवश्यकता आहे. कारण सावित्रीमाई फुले यांच्या तुम्ही लेकी आहात. त्यांच्या कार्याचे स्मरण सतत आपल्या मनात राहो हीच अपेक्षा.