Breaking News

अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या रिव्हॉल्वरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली

मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी स्वत: वर गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या केली आहे. प्रदीर्घ आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी रॉय यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय हे गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 


शुक्रवारी दुपारी 1.40 च्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांच्या गाडीचा चालक त्यांच्या रूममध्ये गेले त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. चालकाने त्यांना लगेच कारने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पिळदार शरीरयष्टी आणि 6 फुटाच्या जवळपास असणारी उंची आणि रूबाबदार व्यक्तिमत्व यामुळे हिमांशू रॉय यांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्येकावर छाप पडत असे. व्यायामाची त्यांना प्रचंड आवड होती. अनेक तास ते जिममध्ये घालवत होते. पिळदार शरीर होण्यासाठी त्यांना स्टिरॉईड्सची सवय लागली आणि त्यानेच त्यांचा घात गेला अशीही माहिती आहे. सुरवातीला त्यांना हाडाचा कॅन्सर झाला आणि नंतर रक्ताचा कॅन्सर यामुळे त्यांना सातत्याने त्रासदायक उपचारांना समोरे जावे लागत होते. याचा त्यांना कंटाळा आला होता. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी अनेक महत्त्वाच्या हय प्रोफाईल प्रकरण सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. गेल्या सहा महिन्यांपासून ते रजेवर होते. उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती.

कर्करोगाला कंटाळून आत्महत्या ; सुसाईड नोटमधून स्पष्ट
अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी प्रदीर्घ आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. यासंबंधीचे सुसाईड नोट मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे.
गेल्या 2 वर्षांपासून हिमांशू रॉय हे हाडांच्या कर्करोगामुळे आजारी होते. आज सकाळी त्यांनी राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. हिमांशू रॉय यांचे जाणे हे मुंबई पोलीस खात्यासाठी सर्वात मोठी हानी असल्याचे सांगितले जाते. अतिशय चाणाक्ष आणि मनमिळावू अधिकारी म्हणून पोलीस खात्यात हिमांशू रॉय यांची ओळख होती.