Breaking News

शेळके कुटुंबियांनी दिली अंधश्रद्धेला मूठमाती!

संगमनेर/प्रतिनिधी। घरातील एखादी पुरुष व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या विधवा झालेल्या पत्नीचे कुंकू पुसून जाते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढले जाते. हातातील बांगड्याही फोडल्या जातात. परंतु संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील खंडू शेळके यांच्या निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नीचे असे न करता अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम या कुटुंबातील सभासदांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमालाचे सरपंच व महाराष्ट्र दारूबंदी आंदोलनाचे सदस्य विधिज्ञ मिनानाथ शेळके, आर्ट ऑफ लिविंगचे साधक संदीप शेळके, तसेच लोकपंचायतचे अमोल शेळके यांचे आजोबा खंडू भानू शेळके यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या परिवाराने खंडू शेळके यांच्या वयोवृद्ध विधवा झालेल्या पत्नी सत्यभामा शेळके यांच्या कपाळाचे कुंकू न पुसता बांगड्या न फोडता तसेच मंगळसूत्रही न काढता त्यांची सर्व मंगल चिन्हे तशीच कायम ठेवण्याचा निर्धार केला आणि तो सत्यातही आणला. मयत व्यक्तीची रक्षा नदीत सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे खडूं शेळके यांची मुले रावसाहेब, आनंदा, बापूसाहेब, बाळासाहेब, ज्ञानेश्वर तसेच वकील मिनानाथ शेळके, रतन कासार यांनी सर्वांनी त्यांची रक्षा नदीत न सोडता अंत्यविधीच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या स्वतःच्या शेतात खड्डा घेऊन त्यात ती रक्षा टाकून दिली. त्यांनतर या कुटूंबियांच्या हस्ते त्याठिकाणी चिकूचे झाड लावण्यात आले. या झाडाचे संगोपन करण्याचा निर्धार या कुटुंबियांनी केला. हे झाड म्हणजे खंडू शेळके यांची आठवण कायम स्मरणात ठेवण्याचे एक आगळेवेगळे काम यातून झाले आहे. या कुटुंबियांच्या या आगळ्यावेगळ्या निर्धाराची अपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.