Breaking News

बांधकाम क्षेत्रातील कामगारांना योजनांचा लाभ ‘यशोधन’ कार्यालयामार्फत पाठपुरावा


संगमनेर प्रतिनिधी - तालुक्यातील बांधकांम क्षेत्रात रोजंदारीवर काम करणारे असंघटित कामगार, महिला, गवंडी, मजूर आदींना माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयामार्फत कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्षामार्फत सुविधा सुरु करुन देण्यात आली आहे, अशी माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात व शहरात सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या जात असतात. गणनिहाय १८ जनसेवकांमार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा मिळवून दिला जात आहे. याचबरोबर तालुक्यातील बांधकाम व्यवसायात काम करणारे सेंट्रीग कामगार, बांधकाम कामगार महिला व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. या योजनांमध्ये पात्र व्यक्तींच्या मुलांना ८ वी ते १० वी साठी दरवर्षी ५ हजार रुपये अर्थसहाय्य, १० वी ते १२ वी १० हजार रु., पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षासाठी २० हजार, रु, इंजिनिअरींगसाठी ६० हजार रु, मेडिकलसाठी १ लाख रु. याप्रमाणे अर्थसहाय्य मिळणार आहे. संबंधित दांपत्यास एकच मुलगी असेल तर १ लाख रुपये मुदत ठेव तसेच ७५ टक्के किंवा कायमचे अपगंत्व असल्यास २ लाख रु, कामावर असतांना मृत्यू झाल्यास वारसांना ५ लाख रु, गंभीर आजारांसाठी १ लाख रु, कामगारांच्या पहिल्या विवाहास ३० हजार तसेच या कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व सुरक्षा विमा योजना अर्थसहाय्य मिळवून दिले जाणार आहे. यासाठी लाभार्थींचे पासपोर्ट साईज ३ फोटो, आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक व वर्षेभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

या योजनांच्या अधिक माहितीसाठी आ. बाळासाहेब थोरात यांचे यशोधन संपर्क कार्यालय दूरध्वनी क्र. ( ०२४२५-२२७३०३ आणि कक्षप्रमुख संजय कोल्हे ९९६०२७५४७५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी कामासाठी गणनिहाय नियुक्त केलेले जनसेवकही सर्वांना मदत करणार असल्याचे ‘यशोधन’ कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.