Breaking News

निवासी डॉक्टरांचा संप मागे निवासी डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य

मुंबई - जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर आज चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणप्रकरणी हा संप पुकारण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या.
बहुतांश मागण्या मान्य झाल्याने अखेर डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याची घोषणा मार्डने केली. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मार्डने हा संप मागे घेतला. निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणी पुकारलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. डॉक्टर आपल्या आंदोलनावर ठाम होते. डॉक्टरच्या या कामबंद आंदोलनामुळे मात्र रुग्णांचे प्रचंड हाल झालेत. जोपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत जेजे मागे हटणार नाही अशी भूमिका डॉक्टरनी घेतली होती. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीने वाढवावी, सुरक्षेसंबंधी मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात करण्यात यावी, अशा मागण्या संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या होत्या.

सर जे.जे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये 2 निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. तसेच रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हीडिओही समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून यात 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट......
या होत्या मागण्या?
- प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक सिक्युरीटी गार्ड नेमावा.
- रुग्णालयात अलार्म सिस्टीम बसविण्यात यावी.
- रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीने वाढवावी.
- सुरक्षेसंबंधी मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात करण्यात यावी.