Breaking News

पत्रकार गांगरे हल्ल्याप्रकरणी पाच जणांना दंड आणि कैद


राहुरी बेकायदा वाळू उपशाविरूद्ध बातम्या प्रसिद्ध केल्याने पत्रकार आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी म्हैसगाव येथील १३ पैकी पाच आरोपींना प्रत्येकी १६ हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कैदेची शिक्षा राहुरी येथील न्यायालयाने ठोठावली. यातील उर्वरित ८ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
तालुक्यातील म्हैसगाव येथील पत्रकार अशोक गागरे यांना दि. ६ जुलै २००९ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मारहाण करण्यात आली. गागरे यांच्या घरात शिरून १३ जणांच्या जमावाने गागरे यांच्यासह त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. गागरे यांनी मुळा नदीपात्रात होत असलेल्या बेकायदेशीररित्या वाळू उपशाबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा राग अनावर होऊन आरोपींनी त्यांच्यावर घरात जाऊन हल्ला केला.

येथील प्रथम न्यायदंडाधिकारी जी. जी. इटकळकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी दंड आणि कैदेची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ए. वाय. शिंपी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.