Breaking News

दरोडेखोरांवर मोक्का अंतर्गत आरोपपत्र दाखल

।संगमनेर/प्रतिनिधी। गुन्हेगारी क्षेत्रात नगर, पुणे जिल्ह्यात आपल्या टोळीची दहशत निर्माण करुन संघटित गुन्हेगारी करणाऱ्या संगमनेर मधील संतोष शिवाजी जाधव याच्या टोळीविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी या टोळीविरोधात नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

संगमनेरात आरोपींविरोधात मोक्काची पहिलीच कारवाईच्या अनुषंगाने न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली. संतोष शिवाजी जाधव हा या टोळीचा प्रमुख आहे. टोळीत संदेश उर्फ दत्तू धांडे व चंदर दादाभाऊ गाडे (दोघे. रा. जवळा ता. पारनेर) आणि शरद बन्सी निचित (शिरुर, जि. पुणे) यांचा या टोळीत समावेश आहे. या सर्वांविरोधात पो. उपअधिक्षक अशोक थोरात यांनी मार्चमध्ये मोक्काची कारवाई केली होती. जाधव याच्या टोळीने अकलापूरमध्ये (घारगाव, संगमनेर) भाऊसाहेब भिमाजी जाधव यांच्या घरात घुसून फिर्यादी दांम्पत्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून जाधव यांना कोयत्याने मारहाण करत त्यांना जखमी केले होते. आरोपींनी त्यांच्याकडील दहा हजारांची रोकड, दागिने आणि घरातील पत्र्याच्या पेट्यांची चोरी केली. त्यानंतर ज‌वळच्याच एका जंगलात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या या चौघाना अकलापुर ग्रामस्थांनी पकडून चोप दिला होता. त्यांनतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप निघोट आणि उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी आराेपींकडून एअरगन, धारदार कोयता, तलवार, मिरचीपुड आणि दोन मोटारसायकली हस्तगत केल्या होत्या.