Breaking News

गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसचे चाक तुटले, जिवीत हानी नाही


नागपूर, दि. 30, मे - मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सोनखांब ते कोहली रेल्वेस्थानकादरम्यान धावत्या गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या ए-2 कोचचे चाक तुटल्याची घटना मंगळवारी सकाळी 8.15 वाजेच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ही गाडी थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. अर्थात हे जवान शेकडो प्रवाशांसाठी देवदूत ठरलेत. या घटनेत एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून यामुळे दिल्ली मार्गावरील सहा गाड्यांना विलंब झाला.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सोनखांब ते कोहली दरम्यान सकाळी रेल्वेगाडी क्रमांक 15015 ही नागपूरकडे येत होती. अचानक या गाडीच्या कोच क्रमांक 14088/सी वातानुकूलित ए-2 कोचचे चाक तुटले. यामुळे जोराचा आवाज झाला. चेन पुलिंग केल्यानंतर गाडीचे चाक तुटल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर चाक तुटलेला कोच वेगळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. दरम्यान दुपारी 2.20 वाजता चाक तुटलेले कोच वेगळा करून ही गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. दुपारी 2.50 वाजता ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीला वातानुकूलित टु टायर कोच लावल्यानंतर दुपारी 4.14 वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
 
आरपीएफ जवानांमुळे अनर्थ टळलागोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या ए-2 कोचमधील विकास सिंग नावाच्या प्रवाशाने आवाज आल्यानंतर चेन पुलिंग केले. त्यावर गाडी थांबली परंतु इतर प्रवाशांनी पुन्हा (फुट राईट) चेन वर के ल्यामुळे गाडी पुढे निघाली. दरम्यान भोपाळवरून या गाडीत गस्त घालत येणारे रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव तुकडीचे जवान प्रमोद दैने, युवराज तलमले, अनिल कुमार हे गाडीखाली उतरले होते. त्यांना या कोचचे चाक तुटल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी धावत्या गाडीत चढून पुन्हा चेन पुलिंग करून गाडी थांबविली. आरपीएफ जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.