काँग्रेसच्या बनावट ध्वनिफितीचे बिंग फुटले
बंगळुरू : जेडीएसच्या मदतीने कर्नाटकची गादी सर करणाऱ्या काँग्रेसच्या एका आमदाराने स्वपक्षाच्याच एका बनावट 'ऑडिओ क्लिप'चे बिंग फोडून काँग्रेसची मोठी फसगत केली आहे.येदियुरप्पा सरकार वाचवण्यासाठी भाजपने कर्नाटकात आमदारांचा घोडेबाजार चालवल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यासंबंधी त्यांनी पुराव्याखातर ३ ध्वनिफिती सादर केल्या होत्या. यातील एका टेपमध्ये येदियुरप्पा यांच्या मुलाने काँग्रेस आमदार शिवराम हेब्बार यांच्या पत्नीला फोन करून त्यांना भाजपच्या बाजूने मतदान केल्याच्या मोबदल्यात मुबलक पैसा व मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मात्र, हेब्बार यांनी सोमवारी एका फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसचा हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. 'प्रस्तुत ऑडिओ क्लिपमधील आवाज माझ्या पत्नीचा नाही. तिला असा कोणताच फोन आला नाही. ऑडिओ टेप बोगस आहे. मी याचा निषेध करतो', असे त्यांनी कानडी भाषेतील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
