Breaking News

नळस्टॉप चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या खर्चाला मंजुरी


पुणे - कर्वेरोडवर नळस्टॉप चौकामध्ये दुमजली उडडाणपूल महामेट्रो बनविणार आहे. त्यासाठी 35 कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नळस्टॉप चौकात कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, म्हात्रे पूल, व पौड रस्त्याने येणारी वाहतूक एकत्र येते. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होते. हा उड्डाणपूल झाल्यास कर्वे रस्ता व पौड रस्त्यावरील वाहतूक दुहेरी मार्गाने पुलावरून होईल. त्यामुळे नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

या रस्त्यावर मेट्रोचा नियोजित मार्ग असल्याने येथील मेट्रो व उड्डाणपूल ही दोन्ही कामे एकाच वेळी पूर्ण होऊ शकणार आहे. महामेट्रोच्या वतीने या उड्डाणपुलाचे काम होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या 2017-18च्या अर्थसंकल्पात तीन कोटी आणि 2018-19च्या अर्थसंकल्पात 14 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे काम महामेट्रोने करुन त्यासाठी येणारा खर्च महापालिकेकडून अदा करण्यास मान्यता दिली आहे. पालिकेच्या अर्थसंक ल्पात टप्प्याटप्प्याने आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.