आधुनिक तंत्रज्ञानद्वारे शेतक-यांच्या समृद्धीवर भर : आ. कोल्हे
कोपरगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला डिजिटल तंत्रज्ञानाच्या जोरावर समृध्द करण्याचा विडा उचलला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील सर्व मंत्री त्यादृष्टीने नियोजन करत आहेत. त्यामुळे कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांना महाराष्ट्रदिनी डिजिटल सात-बारा उतारा देऊन आधुनिक तंत्रज्ञानद्वारे शेतक-यांना समृध्द करण्यावर भर देण्यात आला आहे, असल्याचे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाचे औचित्य साधून कोपरगांव तहसिल अंतर्गत असलेल्या सर्व महसुली मंडळातील शेतक-यांचे सात-बारा उतारा संगणकीकरणाचे काम तहसिलदार किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच पार पडले. त्याचाच एक भाग म्हणून या भागातील शेतक-यांना डिजिटल सातबारा उतारा वाटपाचा शुभारंभ आ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगराध्यक्ष, राजेंद्र सोनवणे, विवेक सोनवणे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे आदींसह विविध अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संगणकीय कामात तहसिल कार्यालयातील कामगारांनी विशेष योगदान दिल्याबददल गुणवंत कर्मचा-यांचा आ. कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.