Breaking News

मान्सून अंदमानात डेरेदाखल ! लवकरच केरळमध्ये दाखल होणार

नवी दिल्ली : मान्सून अंदमानात डेरेदाखल झाला असून, लवकरच तो केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरू होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खासगी संस्थेनेदेखील 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणं महत्त्वाचं असेल.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मान्सूनचा पाऊस समजला होता. मुख्यत्वे शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकास दरावर दिसून येतो. दरवर्षी साधारण 1 जून रोजी मान्सूनचा केरळमध्ये प्रवेश होतो. मात्र यावेळी हवामान तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मान्सूनचे आगमन होईल हा अंदाज खरा ठरतांना दिसून येत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील 24 ते 48 तासांत मालदीव-लक्षद्ीप, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू, बंगालची खाडी या भागात मार्गक्रमण करतो. 
भारतीय हवामान विभागाने आणि स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानूसार यंदा मान्सून भारतात लवकर दाखल होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मान्सून दाखल झाला आहे. दक्षिण अंदमानमधून मान्सून केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर भारताच्या इतर भागात दाखल होतो. देशाच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. लवकरच हा मान्सून महाराष्ट्राबरोबर गोव्यातही दाखल होणार आहे. त्याबरोबरच येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाने शरीराची झालेली लाहीलाही आता काही प्रमाणात कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वार्‍याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.