कापूस उत्पादकांचे ५ कोटी लवकरच जमा : आ. कोल्हे
कोपरगाव (शहर प्रतिनीधी)
मागील हंगामात पर्जन्यमान चांगले झाले. पण शेतक-यांच्या कापूस पिकांवर बोंडअळींने हल्ला केला. त्यात तालुक्यातील बहुतांश शेतक-यांच्या कापूस पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विधीमंडळ स्तरावर पाठपुरावा करून ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करून त्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर शासनाने ७ हजार १३ शेतक-यांना ५ कोटी ८८ लाख ९२ हजार रूपयांची मदत मंजुर केली आहे. सदर मदत लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, की २०१२ पासून बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांवर सातत्याने अन्याय होत आहे. मागील वर्षी पर्जन्यमान चांगले झाले. पण कापूस पीक बोंडअळीमुळे पूर्णपणे नाहीसे झाले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आदींकडे या बोंडअळीच्या मदतीसंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. तालुक्यात ४ हजार ६४९ हेक्टर कापूस क्षेत्र बाधित आहे. त्याप्रमाणे शासानाने सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करून तहसिल व तालुका कृषि अधिकारीस्तरावर ही माहिती पाठविण्यात आली आहे.