Breaking News

अधिकृतरित्या वाळू वाहतूक करणार्‍यांवर अनाधिकृत वाळू तस्करांचा हल्ला


जामखेड : शासकीय नियमानुसार नियम व अटीनुसार टेंडर भरून आम्ही वाळू उपसा करत आहेत. तरीही आघीतील वाळू तस्कर व अवैध वाळू उपसा करणारे काही गुंड आमचा वाळू उपसा बंद करून वाहनाची मोडतोड करतात व दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी देतात. यांचा बंदोबस्त प्रशासनाने ताबडतोब करावा व शासकीय नियमानुसार चालणारी वाळू वाहतूक करू द्यावी अशी मागणी यश एंटरप्राईजेसचे संचालक कुणाल पाटील यांनी केली आहे.
 
जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत फिर्यादी बाळासाहेब रामदास बोराटे (वय 32) रा. आघी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझ्या मालवाहू (एम एच- 13 ए एक्स 3600) सदर गाडीतून वाळूची वाहतूक करत होतो. गेल्या पाच दिवसांपासून जामखेड तालुक्यातील आघी शिवारात सिना नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचा ठेका कायदेशीर रित्या सुरू झाला होता. सदर नदीपात्रात मी व माझा वाहनचालक दिलीप साहेबराव पवार गाडी घेऊन वाळू भरण्यासाठी ठेक्याकडे जात असताना सीना नदीपात्राजवळील आरोपी अक्षय दिलीप निंबाळकर, रोहित अशोक निंबाळकर, सुरेश मोहन भोईटे, आदेश अनिल निंबाळकर, मनोज शिवाजी देवकर आदी चार ते पाच जण रा. सर्व दिघी ता. कर्जत हे अचानक गाडीस आडवे येवून तू वाळू भरण्यासाठी का येतो? नदीत परत यायचे नाही, म्हणून गाडीवर दगडफेक केली. मला व गाडीचालकास गाडी बाहेर ओढून शिवीगाळ व दमदाटी केली. मनोज देवकर याने दगडाने मारहाण केली. 

यावेळी रोहित निंबाळकर यांने गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चैन व उजव्या हातातील प्रत्येकी आठ ग्रॅमच्या दोन अंगठ्या काढून घेत, निलेश निंबाळकर व एका अनोळखी व्यक्तीने खिशातील रोख रक्कम वीस हजार रुपये काढून घेतले. शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. चैन, दोन अंगठ्या व वीस हजार रुपये रोख असे एकूण 68 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. तसेच पुन्हा वाळू भरण्यासाठी आल्यास जीवे मारुन टाकू अशी धमकी दिल्याची फिर्याद जामखेड पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता 1860 नुसार 307, 395, 143, 147, 149, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. हेड कॉ. विठ्ठल चव्हाण, गहिनीनाथ यादव हे करत आहेत.

यशराज एटरप्राईजेसचे संचालक कुणाल पाटील यांनी दै. लोकमंथनशी बोलताना सांगितले की, आम्ही शासकीय नियमानुसार अटी व शर्तीचे पालन करून शासनाचा कर भरून ठेका घेतला आहे. तसेच पोलिस बंदोबस्तासाठीही पैसे भरले आहेत. आम्ही अधिकृतपणे वाळू उपसा करत आहेत. परंतु परिसरातील गावगुंड व वाळू तस्कर नियमाचे उल्लंघन करून व दमबाजी करत अनाधिकृतपणे वाळू उपसा करण्यासाठी आम्हाला आडवे येत आहेत. प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.