शहरविकास केल्याचे जनतेसमोर येऊन सांगा! डॉ. सुजय विखे यांचे आवाहन
अहमदनगर शहरातील लोकप्रतिनिधी विकासकामे करण्याऐवजी ‘फ्लेक्स’ लावण्यातच धन्यता मानताना दिसून येतात. विकासाचे तीन तेरा कसे वाजवले जातात, याचे मुकुंदनगर हे एक उत्तम उदहारण आहे. येथील लोकप्रतिनिधी मात्र कागदावर अथवा फ्लेक्सवरच हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे सांगत आहेत. नगरमध्ये फ्लेक्सबोर्डवरच विकास दिसतो. आतापर्यंत या शहराच्या लोकप्रतिनिधींनी कोणता विकास केला, हे जनतेसमोर येऊन सांगावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले.
जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मुकुंदनगर येथील जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेत आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. ते म्हणाले, मनपाच्या सुविधांची नगरमध्ये वानवा असल्याचे चित्र आहे. मोफत सर्वरोग निदान आणि उपचार शिबिरांचे आयोजन ग्रामीण भागात आम्ही करीत आलो आहोत. आतापर्यंत सुमारे १५ शिबिरे संपन्न झाली असून त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. शहरी भागातही या शिबिरांची गरज ओळखून मुकुंदनगर परिसरात हे शिबिर घेण्यात आले आहे. कुठलीही निवडणूक अथवा लाभ मिळावा, यासाठी आम्ही शिबिर आयोजित करत नाही. तर दिवसेंदिवस वैद्यकीय सेवा महागडी होत असताना मोफत शिबिरे ही आजची गरज बनली आहेत. मुकुंदनगरमध्ये विविध गरीब कुटुंबे वास्तव्यास असून ते वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले.
माझ्या राजकीय वाटचालींविषयी तर्कवितर्क लढ़विले जात आहेत. मात्र मी अजून तरी कुठल्याही पक्षाची उमेदवारी मागितली नाही. तरी पण अनेकजण मला सल्ला देतात. परंतु वेळ आल्यावर जनतेला जो पर्याय योग्य वाटेल, तो पर्याय जनता सूज्ञपणे निवडल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी अर्शद शेख, अब्दुल कादिर, डॉ. काझी सय्यद, निजाम जहागिरदार, अब्दुल सलाम, नगरसेवक फय्याज शेख, नगरसेविका नसीम खान, रामचंद्र दिघे, फारुक शेख, मोहसीन शेख, मुद्दसर शेख, नईम सरदार, नागरिक व रुग्ण उपस्थित होते.
या शिबिरात हृदयविकार, मेंदूविकार, मधुमेह, दमा, छातीचे विकार, मोतीबिंदू, काचबिंदू, अस्थिरोग, स्त्री रोग, बालरोग आदी विविध रोगांची चिकित्सा करून उपचार करण्यात आले.