उद्योग उभारणीसाठी नवउद्योजकांना शासनातर्फे विविध संधी
पुढचे पाऊल आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे ‘महाराष्ट्र महोत्सव जागर महाराष्ट्र दिनाचा’ दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पहिल्या दिवशीच्या पाचव्या सत्रात‘महाराष्ट्रातील उद्योजक–आव्हाने आणि संधी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, केंदीय सूक्ष्म, लघु, मध्यम विभागाचे आयुक्त आनंद शेरखाने,वास्तुविशारद उदय पांडे, उद्योजक प्रदीप करंबळेकर हे या चर्चा सत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्राची अध्यक्षता श्री शेरखाने यांनी केली.
श्री.देवरा म्हणाले, महाराष्ट्रात जगभरातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या निमित्त अनेक संधी नव उद्योजकांना उपलब्ध होत आहेत. यासाठी केंद्राने सुरू केलेल्या योजनांचा लाभ महाराष्ट्र शासनाच्यावतीने नव तरूण उद्योजकांना दिला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उद्योजकतेकडे वळत असून वर्तमान केंद्र शासन आणि राज्य शासनाचे धोरणही नव उद्योजकांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. कोणताही उद्योग उभारताना सृजनशीलता, सातत्य असणे गरजेच असल्याचे प्रदीप करंबळेकर म्हणाले. आज व्यावसायिकतेसाठी कर्ज देण्यासाठी मोठ्या खाजगी कपंन्या तयार आहेत मात्र, नुसत्या चांगल्या कल्पना असून चालत नाही तर त्याची अंमलबजावणीही तेवढीच चांगली व्हावी अशी अपेक्षा असते, असे विचार श्री.करंबळेकर यांनी मांडले.
शासकीय नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे श्री.पांडे म्हणाले, व्यवसायात रोज नवनवीन आव्हाने असतात त्या आव्हानांना समोर जाण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करणे व्यवसात अत्यंत महत्वाचे आहे. व्यवसायात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करता आलं पाहिजे, असे विचार श्री.पांडे यांनी यावेळी मांडले.
समारोपात श्री.शेरखाने यांनी केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु, मध्यम या क्षेत्राच्या वाढीसाठी देशभर उद्योजकता केंद्रे उभारण्यात आले असल्याची माहिती दिली. यासह केंद्र शासनातर्फे महिला उद्योजकतेसाठी उदय सखी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगतिले. यासह मुद्रा योजना, स्टार्ट इंडिया याविषयीही सांगितले.
