Breaking News

‘रासेयो’चे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज : डॉ. देशमुख


‘आपत्ती येऊ नये, ही सर्वांची भूमिका असते. मात्र काही कारणाने वेळ आलीच तर तरुण आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर असतात. महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी 'आव्हान' शिबिराची सुरुवात केली आहे. या शिबिरात प्रशिक्षण घेणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आव्हान २०१८’ जिल्हास्तरीय निवड चाचणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पुणे ग्रामीण राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. श्रीकांत फुलसुंदर, अहमदनगर रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, नैसर्गिक आपत्ती ही सांगून येणारी नसते. अशा वेळी होणारी जिवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे लागते. आज या निवड चाचणीतून निवड झालेले रासेयो स्वयंसेवक आपत्तीच्या वेळी नक्कीच मदतीला येतील. राष्ट्रीय सेवा योजनेचे, पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक प्रा. फुलसुंदर म्हणाले, नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. आपले मन शांत ठेऊन स्वतःच्या बचावाबरोबरच इतरांचाही बचाव कसा करावा, हे शिकविणारे हे शिबिर विद्यार्थीदशेत रासेयो स्वयंसेवकांना बरेच काही शिकविणारे आहे. या शिबिरामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांनी समाजाला उपयोगी होणारी मदत केली पाहिजे. प्रारंभी डॉ. प्रताप फलफले यांनी प्रास्ताविक केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम यांनी आभार मानले.