Breaking News

छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त पोस्टर स्पर्धेने युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश


अहमदनगर - नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था तसेच श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या व्यसनमुक्तीवर राज्यस्तरीय खुली पोस्टर स्पर्धेला ग्रामीण भागातून उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिव मंदा डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, गौतम फलके, सचिन जाधव, मयुर काळे, सोमनाथ डोंगरे, अक्षय पवार, संतोष फलके, तेजस्वीनी डोंगरे, पै.स्वराज डोंगरे, कु.येवले, अक्षरी येवले आदि उपस्थित होते.

सध्याचा युवक हा निराशेपोटी व्यसनाकडे वळत आहे. युवकांनी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवण्याची गरज आहे. त्यांच्या आदर्शाने सक्षम पिढी घडणार आहे. युवकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यासाठी व व्यसनापासून लांब राहण्याचा संदेश देण्याकरिता व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे पै.नाना डोंगरे यांनी सांगितले.

राज्यस्तरीय खुली पोस्टर स्पर्धेत जिल्ह्यासह राज्यातून प्रवेशिका आल्या होत्या. यामध्ये उत्तम घोषवाक्य व व्यसनमुक्तीचा संदेश देणार्‍या पोस्टरांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली. घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्रतिक्षा सुसरे हीने पटकाविले तर द्वितीय पियुष शिनगारे ठरला. या विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले.