Breaking News

‘नान्नज’ला पाणी फाऊंडेशनचे काम अंतिम टप्प्यात!

जामखेड ता. प्रतिनिधी तालुक्यातील नान्नज येथील पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेले काम अंतिम टप्यात आले आहे. उर्वरित काम १५ दिवसांत वेगात व्हावे, यासाठी सरपंच, ग्रामस्थ आणि महिला बचतगटाच्या माध्यमातून आज {दि. ९ } महाश्रमदान करून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. 

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र जोरदार काम सुरु आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यासाठी गाव पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायत सेवाभावी संस्था तसेच समाजसेवक आदींच्या माध्यमातून श्रमदानाने ऊंच सखल व उताराच्या भागावर चर चारी खोदून पाणी अडविण्याचा मोठा प्रयत्न होत आहे. या कामासाठी भारतीय जैन संघटना या सेवाभावी संस्थेकडून मशीनरी पुरविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नान्नज येथेही ४५ दिवस श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी मोलाची धावपळ सुरु आहे. श्रमदान आणि उत्तम काम करून आजतागायत कामाचे ३० दिवस पूर्ण केले आहेत. १ हजार ५०० घनमीटर काम पूर्ण करून १० लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, यासाठी वापरण्यात येत असलेल्या मशीनरींच्या इंधनासाठी सर्वांनी आर्थिक मदत करावी आणि श्रमदानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नान्नजच्या सरपंच विद्या मोहळकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.