Breaking News

आशियाई जेतेपदाचे लक्ष्य-जेमिमा रॉड्रिग्ज

क्रिकेट हा भारतीय क्रीडारसिकांचा आवडतीचा क्रीडा प्रकार असून भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कामगिरी मिश्र स्वरूपाची असली तरी आगामी आशियाई चषकात आम्ही नक्कीच जेतेपद मिळवू, अशी आशावादी प्रतिक्रिया भारताची युवा क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्जने व्यक्त केली. कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी जेमिमा तिच्या कुटुंबासह उपस्थित होती.

वयाच्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेमिमाचे सुरुवातीला वेगळेच लक्ष्य गाठण्याचे ठरले होते. महाराष्ट्राच्या १२ व १७ वर्षांखालील महिलांच्या हॉकी संघात तिची निवडदेखील झाली होती. मात्र, वडील व भावंडांना क्रिकेट खेळताना पाहून तिची क्रिकेटमधील रुची वाढली व ती या खेळाकडे वळली. अवघ्या १३व्या वर्षी तिची राज्याच्या क्रिकेट संघात निवड झाली .

‘‘महिला क्रिकेटने गेल्या काही महिन्यांपासून कौतुकास्पद प्रगती केली आहे. याचे श्रेय साहजिकच गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेला जाते. भारतातील मुली क्रिकेटकडे गंभीरपणे पाहायला लागल्या आहेत. मी स्वत: मुंबईतील मुलींच्या स्थानिक सामन्यांच्या स्पर्धेसाठी अतिथी म्हणून भेट देते, तेव्हा तेथील हजारो मुलींना एकत्र खेळताना पाहून आनंद होतो,’’ अशी प्रतिक्रिया जेमिमाने महिला क्रिकेटच्या सद्य:परिस्थितीवर दिली.

पुरुषांच्या बरोबरीने चालण्यासाठी अजून अवकाश लागेल असे तिने नमूद केले. ‘‘पुरुषांच्या तुलनेत सध्याही महिला क्रिकेटला कमीच लेखले जाते. मात्र, काळानुसार या प्रथेत बदल घडेल हे मला ठाऊक आहे. यासाठी आम्ही जागतिक पातळीवर अजून चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. या वर्षी मलेशियात होणाऱ्या आशिया चषकात जेतेपद मिळवू याची खात्री आहे. असे जेमिमा म्हणाली.