Breaking News

कापूस उत्पादकांना बॉण्ड अळीची नुकसान भरपाई मिळेना!


सोनई गेल्या वर्षी कपाशी पिकावर बॉन्ड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना या संकटात आर्थिक मदत करून नुकसान भरपाई देण्याचे सरकारकडून मान्य करण्यात आले. मात्र कपाशीचा दुसरा हंगाम सुरु होण्याची वेळ आली. तरी शासनस्तरावर कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे ही घोषणाच फसवी आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. 
कपाशी उत्पादक बोन्ड अळी नुकसान भरपाई आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेवर होते. मात्र अद्यापतरी नुकसान भरपाईबाबत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे बोन्डअळी नुकसान भरपाईचे काय झाले असा प्रश्न सर्वसामान्य कपाशी उत्पादक शेतकरी चर्चा करीत आहेत. नेवासा तालुका हा मुळा धरण लाभ क्षेत्रात येत असल्याने हा तालुका ऊसाचे आगार समजला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत कपाशीला चांगले बाजारभाव आल्याने बरेचशे शेतकरी एक नगदी पीक म्हणून कपाशीकडे वळले. गेल्या वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणी योग्य पाऊस झाल्याने नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड झाली. कपाशी पीक जोमात असतानाच अचानक बोन्डअळीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे दहा वीस टक्केही पीक हाती लागले नाही. नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने एन. डी. आर. एफ. च्या निकषानुसार जिरायत कपाशीला साडे सहा हजार आणि बागायत कपाशीला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टरी भरपाई देण्याबाबत घोषणा केली. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्षात पंचनामे करण्याचे आदेश काढले. त्यानुसार कृषी विभागाकडून जीपीआरएसच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले. 

जवळपास सगळ्याच क्षेत्रावर बोन्डअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. कृषी विभागाकडून त्या प्रकारचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला. दरम्यानच्या काळात शासनाने वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागवून घेतली असली तरी भरपाई देण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. आता दुसरा हंगाम सुरु झाला. तरी शासन अजून किती ‘अभ्यास’ करणार आहे, असा सवाल शेतकरी वर्गामधून उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी कपाशीवर बोन्डअळीचे संकट ओढावल्याने आलेले हातचे पीक वाया गेले. एकरी एक ते दिड क्विंटलसुद्धा कापूस निघाला नाही. नुकसान भरपाई मिळणार असल्याने बँकेचे पास बुक सात बारा उतारा घेण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत एक रुपयादेखील दिला गेला नाही.