Breaking News

भारतीय जैन संघटनेच्या कर्जत टीमचे अमिर खान ला श्रमदानासाठी निमंत्रण

कर्जत / प्रतिनिधी । 18 : तालुक्यात श्रमदानातून उभारलेल्या तुफानाची अमीर खान यांनी दखल घेत टाळ्या वाजवून कौतुक केले. भारतीय जैन संघटनेचे आशिष बोरा यांनी कर्जतच्या टीमबरोबर श्रमदान करण्यासाठी अमिर खान यांना कर्जतला येण्याचे निमंत्रण दिले, त्यास त्यांनी हसून प्रतिसाद दिला, असून आता कर्जत तालुक्याला खान यांची प्रतीक्षा आहे. भारतीय जैन संघटनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांची बैठक धुळे येथे अभीनेते अमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी घेतली. धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार व नाशिक या पाच जिल्ह्यातील पदाधिकार्‍याच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष आदेश चंगेडीया यांनी स्वागत करताना जिल्ह्यातील कामाचा आढावा मांडला. तर प्रास्ताविक नंदू साकला यांनी केले. यानंतर अमीर खान यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधताना सत्यमेव जयते पासून पानी फाऊंडेशनच्या निर्मितीचा प्रवास मांडला. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था यांचे बरोबरचे अनुभव विशद केले. शांतीलाल मूथ्था हे अत्यंत जलद निर्णय घेतात. माझा, सत्यजित भटकळ व शांतीलाल मूथ्था यांचा हेतू समान आहे. जैन समाजाची जी तत्वे आहेत, तीच या कामाची प्रेरणा आहेत, असे म्हणत इतरांना समजून घेण्याची व माफ करण्याची कार्यपद्धतीमुळे आपण प्रभावित आहोत असे अमीर खान यांनी म्हटले. यावेळी बोरा यांनी तालुक्याचा आढावा मांडताना गेली 35 दिवस सुरू असलेल्या श्रम चळवळीची सविस्तर माहिती दिली. तालुक्यातील प्रांत, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी या शासकीय अधिकार्‍यासह रोटरी क्लब, स्त्री फाउंडेशन, छ.शिवाजी महाराज क्रीडा प्रतिष्ठान यांचेसह विविध सामाजिक संघटना, शासकीय कर्मचार्‍यांसह भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांचे नेतृत्वाखाली महिलांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे सांगितले. बोरा यांनी दिलेली माहिती अत्यंत मन लाऊन एकताना अमीर खान यांनी वेळोवेळी विशेष दाद देत. यावेळी अमीर खान व किरण राव यांनी आमच्या बरोबर श्रमदानासाठी कर्जत तालुक्यात यावे असे निमंत्रण बोरा यांनी जाहीरपणे दिले. या बैठकीस नगर जिल्ह्यातून आलेले पाथर्डीचे विश्‍वजित गुगळे, घेवरचंद भंडारी, राजेंद्र पटवा, नगरचे अमित बोरा, संतोष कासवा, आदी उपस्थित होते. तर मंचावर किरण राव, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक चोपडा, विजय दुग्गड आदी उपस्थित होते.