Breaking News

शेतकर्‍यांचे कल्याण हेच पक्षाचे प्राधान्य कर्नाटकात भाजपने केली जाहीरनाम्याची घोषणा


बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा घोषित केला. पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. शेतकर्‍यांना 1 लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत स्मार्ट फोन अशा घोषणांचा जाहीरनाम्यात समावेश आहे. येडियुरप्पा यांनी यावेळी त्यांनी शेतकर्‍यांचे कल्याण हेच पक्षाचे प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. भाजपच्या जाहीरनाम्याची घोषणा करताना येडियुरप्पा म्हणाले, की आपल्या अन्नदात्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही शेतकर्‍यांच्या राष्ट्रीय बँकेतील कर्जासह सहकारी बँकेतील 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू. शेतकर्‍यांच्या कल्याणालाच आम्ही नेहमी प्राधान्य दिले आहे. कर्नाटकमधील सर्व सिंचन प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करत जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी 1 लाख 50 कोटी रुपयांची सुजलाम सुफलाम कर्नाटक योजना सुरू करू. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या भावातील चढ उतारांमध्ये शेतकर्‍यांना मदत होण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांच्या ’रायथू बंधू मार्केट इंटरव्हेंशन फंड’ची देखील घोषणा केली. तसेच शेतकर्‍यांना शेती पंप चालवण्यासाठी 10 तास वीज पुरवठ्याचेही आश्‍वासन दिले. आपल्या जाहीरनाम्यात येडियुरप्पा यांनी निवडक 1 हजार शेतकर्‍यांना इस्त्राईल आणि चीन सारख्या देशांमध्ये अभ्यास दौर्‍यावर जाण्याची संधी देण्याचीही घोषणा केली.