Breaking News

डॉ. आगुस्तीना यांना अखेरचा भावपूर्ण निरोप


शेवगाव - येथील नित्यसेवा हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध डॉक्टर आगुस्तीना (करकरे मॅडम) यांचे नुकतेच पाथर्डी येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव पाथर्डी येथील आरोग्य माता केंद्रामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर रविवारी 4 वाजता शेवगाव येथील रोमन कॅटलीक चर्चमध्ये प्रार्थना होऊन नित्यसेवा हॉस्पिटलच्या प्रांगणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी समाजातील विविध घटकातील मान्यंवर उपस्थित होते.

आपल्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी सुमारे अडीच लाख महिलांची नैसर्गिक प्रसुती केली. आरोग्य क्षेत्रातील जनसेवेचा वारसा लाभलेल्या डॉ अगुस्तीया त्यांचे मूळ नाव मेहरनाज करकरिया होते. त्यांचा जन्म मुंबई येथे 4 डिसेंबर 1945 ला झाला होता. उच्च मध्यमवर्गीय पारसी कुटुंबातील मेहजी आणि होणारी यांची ती सर्वात धाकटी कन्या. त्यांचे वडील हे प्रगतशील उद्योगपती व व्यवसायिक होते. अतिशय कमी वयामध्ये डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याची इच्छा त्यांच्या पालकांनी व सिस्टरांच्या मनात रुजवली.

त्यांचे शालेय शिक्षण हे मुंबई व पुणे येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे व मेडिकल चा अभ्यास त्यांनी ए. एफ. एस. सी. मध्ये पूर्ण केला. त्यांचे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र यांचे शिक्षण पुणे येथे झाले. मिशनरी हॉस्पिटलमध्ये राहून लोकांची सेवा करण्याची त्यांची नेहमीची इच्छा होती. वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्यंत आवश्यक असलेल्या ठिकाणी त्यांनी स्त्रीरोग तज्ञ म्हणून सन 1969 ते 1971 काम केले. तसेच 1971 ते 1976 यावर्षी त्यांनी मिशन हॉस्पिटल जालना येथे काम केले. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड सारख्या दुर्गम भागातील मिशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी सन 1976 ते 1981 पर्यंत काम केले. ही सर्व हॉस्पिटल प्रॉटेस्टंट मिशनरीज चालवत होते. 1981 मध्ये पाचवड हॉस्पिटल ला अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध झाल्याने डॉ. आगुस्तीना यांनी नित्यसेवा हॉस्पिटल शेवगाव येथे आपले कार्य सुरू केले. दरम्यानच्या काळात कम्युनिटी सिस्टरांनी डॉ. करकरीया यांना बाप्तीस्मा घेऊन कम्युनिटीमध्ये प्रवेश करण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये वाढवली. त्याचा योग्य परिणाम म्हणूनच 20 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी होली स्पिरीट चर्च शेवगाव येथे बाप्तीस्मा घेतला या भव्यदिव्य सोहळ्याला मार्गदर्शक फादर नयनो उपस्थित होते.

त्यांनी पूर्ण आयुष्य दुसर्‍यांच्या सेवेसाठी रात्रंदिवस वेळेचे भान न राखता खाण्यापिण्याकडे लक्ष न देता आराम व प्रकृतीची काळजी न घेता अगदी कशाचीही तमा न बाळगता शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णांची सेवा केली. त्यांना कॅन्सरचा आजार होता. हे त्यांना माहीत असून सुद्धा गरीब गरजू महिलांसाठी त्या ओ.पी. डी. मध्ये हजर असत. शेवटच्या क्षणाला त्यांना निरोप देण्यासाठी आलेले त्यांचे असंख्य चाहते सर्व दुःखकिंत, धर्मगुरू मित्र-मैत्रिणी, स्नेही, हितचिंतक उपस्थित होते.

त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नित्यसेवा हॉस्पिटल शेवगावच्या प्रांगणात केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन प्रताप काका ढाकणे, भाजपाच्या वतीने नगरसेवक अरुण मुंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, आबासाहेब काकडे विद्यालयाचे सुनील आढाव, शेवगाव नगर परिषदेचे अजिंक्य लांडे, सिस्टर जेमा, सिस्टर मेरी एपन, सिस्टर मेरी थॉमस, सिस्टर प्रतिमा फर्नांडिस, प्रकाश वाघमारे, रिजवान शेख, अनिल सरोदे, धर्मगुरू व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.