Breaking News

पालकमंत्री प्रा. शिंदेंच्याच तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे!


जामखेड राज्याचे कर्तबगार {?} जलसंधारण, राजशिष्टाचारमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याच तालुक्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. चोऱ्या, दरोडे, दिवसाढवळ्या खून, वाळूतस्करी असे अनेक प्रकार या तालुक्यात सर्रास सुरु आहेत. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे प्रा. शिंदे जामखेड तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. तालुक्यात गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रणच राहिलेले नाही. अशा परिस्थितीत येथे नव्याने बदलून आलेले पोलीस अधिकारीदेखील गोंधळून गेले आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त सुरु आहे नाही, ही शंका उपस्थित व्हावी, अशी परिस्थिती या तालुक्यात पहायला मिळत आहे. 
तालुक्यातील नायगावच्या संदीप ईश्वर उगले यांच्या घरी धाडसी चोरी झाली. यात चोरटयांनी २ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. त्याचप्रमाणे जामखेड शहरातील येथील बाजारतळावर असलेल्या दुर्गामाता मंदिरातील लोखंडी पत्र्याची दानपेटी अज्ञात चोरटय़ांनी फोडून त्यातील २५ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. तालुक्यातील नान्नजमध्येही ..... दुर्गामाता मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जामखेड तालुक्यातच या घटना कशा घडताहेत, हे कोण करतय, या सर्वांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

पोलिसांत ‘सिंघम’ संचारायला हवा! 
जामखेडला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तालुक्यातील गुन्हेगार आणि भुरट्या चोरांच्या मानसिकतेचा अभ्यास करून बंदोबस्त करण्यासाठी कणखर भूमिका घेण्याची येथील जनतेची अपेक्षा आहे. हा संपूर्ण तालुका दहशतीच्या सावटाखाली आला आहे. गुन्हेगारांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज आहे. अवैध धंदे आणि गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट उखडून काढण्यासाठी पोलीस निरीक्षक पवार आणि येथील सर्वच पोलिसांत एकदा ‘सिंघम’ संचारायला हवा, अशी जनतेची अपेक्षा आहे.