अहमदनगर : ‘जय हरी’चा जयघोष करीत आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी माजी आ. शंकरराव गडाखांच्या ताब्यातून सत्ता हिसकावून घेतली खरी. मात्र गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत नेवासे तालुक्यात ठराविक ठिकाणचा अपवाद सोडता अन्य ठिकाणी अर्धवट, उखडलेले रस्ते हेच चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या जनतेला स्वतःशीच हेच का ‘अच्छे दिन’ असे म्हणत कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली आहे.
नेवासा शहरात ठराविक ठिकाणी रस्त्यांची कामे करून सुरुवातीच्या काळात आ. मुरकुटे यांनी कामाचा धडाका दाखविला. मात्र नंतर या कामांचा वेग कासवाच्या गतीपेक्षा कमी झाला आहे. यामध्ये घोडेगावहून शिंगणापूरला येत असल्याचे ताजे उदाहरण देता येईल. अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता कसाबसा तयार {?} झाला. मात्र या रस्त्यावर डांबर टाकण्यासाठी संबंधित ठेकेदाराला डांबर आणि वेळ हा दोन्हीही बाबी अद्यापपर्यंत मिळाल्या नाहीत. आ. मुरकुटेंना तालुक्याचा लोकप्रतिनिधी करून मोठी चूक केल्याचा मनस्ताप या भागातील जनता व्यक्त करीत आहे