Breaking News

दगडाच्या खाणीत बुडून आजीसह नातवाचा मृत्यू


राहाता : तालुक्यातील सावळीविहिर खुर्द येथे राहणार्‍या लिलाबाई आण्णासाहेब आहिरे (वय-46) यांचेकडे शाळेला सुट्टी लागली म्हणून सुमित अनिल बागुल (वय-15 वर्षे)रा. अंगणगाव रोड, येवला व अनुष्का अरुण शिंगाडे (वय-8 वर्षे) रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव ही मुलीची मुले चार दिवसांपूर्वी सुट्टीसाठी आली होती. काल रोजी दुपारी 1 च्या सुमारास घराजवळ असलेल्या दगडाच्या खाणीत आजी समावेत धुण्यासाठी गेली असता, ही दोनही नातवंडे तिच्या पाठोपाठ गेली. ह्या दुर्घटनेत आजी लिलाबाई आहिरे व नातू सुमित बागुल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, आजी लिलाबाई आहिरे या धुणे धूत असताना ही दोनही मुले आजी जवळ होती. मात्र उन्हाळा असल्यामुळे मात्र कडेलाच असलेल्या पाण्यात सुमितला आंघोळीचा मोह झाला. आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला, त्याची बहीण अनुष्का हीने आरडा-ओरड करून त्याला वाचवण्यासाठी तिनेही पाण्यात प्रवेश केला, मात्र आपली दोन्ही नातवंडे पाण्यात बुडत आहेत, हे लक्षात येताच आजी लिलाबाई आहिरे यांनी कुठलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. मात्र साचलेले पाणी आणि या खाणीतून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन झाल्याने या खाणीत खोलवर पाणी होते. जवळपास कोणी नसल्याने या घटनेत लिलाबाई आण्णासाहेब आहिरे व नातू सुमित अनिल बागुल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरडा ओरड व काहीतरी अनुचित प्रकार घडला आहे हे लक्षात येताच जवळच असलेल्या काही तरुणांनी पुढाकार घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना आजी आणि नातवाचा मृत्यू झाला, तर आठ वर्षाची मुलगी अनुष्का हिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. 

घटनेची माहिती साईबाबा हॉस्पिटलने शिर्डी पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 46/2018 भादंवी.174 प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन खाणीची पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल शिर्डी पोलिसांनी घेतली असून रात्री उशिरा पर्यंत महसुलच्या जबाबदार अधिकार्‍याने भेट दिली नसल्याचे दिसून आले. या दुर्दैवी घटनेमुळे सावळीविहिर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. या खाणीची मालकी एका सोसायटीची असल्याची चर्चा यावेळी ग्रामस्थांमधून होत होती.