Breaking News

इंधन दरवाढीमुळे देशभरातून संताप देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत

नवी दिल्ली/प्रतिनिधी : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होत असलेल्या सततच्या वाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचा दर 84 रुपयांच्या वर गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडत आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, इंधन दर शंभरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 

देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे. अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल 72.69 रुपये प्रति लिटर आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 73.73 रुपये आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपयांवर पोहोचलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यानंतर मागील 8 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीत बुधवारी पेट्रोल 77 रुपये 17 पैशांवर आहे. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे जे दर आहेत, ते भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही नव्हते. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलने 14 सप्टेंबर 2013 रोजी सर्वाधिक 76.6 रुपयांचा दर गाठला होता. गेल्या 10 दिवसांमध्ये दररोज इंधनाचे दर वाढले आहेत. सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले असताना, मोदी सरकार यावर तोडगा काढणार का याकडे सार्‍या देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, तेल उत्पादनांचा समावेश जीएसटीमध्ये करावा तसेच यावरील अबकारी कर (एक्साईज) कमी करावा, अशी मागणी सातत्याने ’अ‍ॅसोचेम’, ’फिक्की’ या संस्थांमार्फत केली जात आहे.

महाराष्ट्रात 86 रूपये पेट्रेाल दर
कर्नाटक निवडणूकीनंतर दरात वाढ
पेट्रोलचे दर शंभरीकडे वाटचाल
देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात
गेल्या 10 दिवसांपासून दररोज दरात वाढ
तेल उत्पादनांचा जीएसटीत समावेशाची मागणी