Breaking News

अधिक मासानिमित्त अकोले गावात सप्ताहाची सांगता जि.प अध्यक्षा शालिनीताई विखे राहणार उपस्थित

पाथर्डी / वि. प्रतिनिधी । ऐश्‍वर्यसंपन्न संत वैकुंठवासी भगवानबाबांनी, पाथर्डी तालुक्यातील अकोले गावात सुरू केलेल्या अधिकमासानिमित्त सप्ताहाची परंपरा अकोले येथील समस्त ग्रामस्थांनी आजतागायत निरंतर सुरू ठेवली आहे. त्यानुसार राजकीय वैमनस्य विसरुन सर्व ग्रामस्थ या सप्ताहात एकदिलाने सहभागी होतात. दर तीन वर्षांतून एकदा अधिक मास येत असल्याने दर तीन वर्षांनी अकोल्याचे ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने या सप्ताहाचे आयोजन करतात. खरवंडी कासार येथील सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे उद्घाटन करण्यासाठी डॉ. सुजय विखे जात असताना, अकोल्याचे ग्रामस्थ व सप्ताह कमिटीने त्यांचे अकोले फाट्यावर जंगी स्वागत करुन सप्ताहाचे निमंत्रण दिले.

परंतु पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे जर येता आले नाही तर त्यांच्या मातोश्री व अहमदनगर जि. प.च्या अध्यक्षा ना. शालिनी विखे पाटील सप्ताहाच्या सांगता समारंभास अवश्य येण्याचे आश्‍वासन डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वागतोत्सुकांना दिले होते. त्यानुसार त्या उद्या अकोले येथे येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. परंतु तत्पुर्वीच या सप्ताहाच्या सांगता समारंभास, महाप्रसादासाठी लागणारी साखरेची पाच पोती प्रवरेहून अचानक अकोल्यात दाखल झाल्याने न मागता प्रवरेने दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामस्थ कृतार्थ भावनेने ओथंबून गेले. त्याचबरोबर ना. शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून, जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या भव्यदिव्य कार्यालयासाठी 20 लाख रुपये मंजूर होणार असून लवकरच त्यांच्या शुभहस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याचे ज्येष्ठ नेते संभाजी वाघ यांनी जाहीर केल्याने ग्रामस्थ अवाक् झाले.
न मागता अनपेक्षितरित्या मिळालेल्या साखरेत निधीचे तूप पडल्याने अकोल्याचे ग्रामस्थ विखे कुटुंबाच्या ऋणानुबंधात बांधले गेले. यावेळी प्रवरेहून साखर घेऊन आलेल्या पिकअप व्हॅनची, अकोले ग्रामस्थांनी विधिवत पुजा केली. व्हॅनबरोबर आलेले पाथर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रतिक खेडकर, बबन सबलस, डॉ. विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक अंजाबापू गोल्हार यांचे ग्रामस्थांनी उस्फुर्त स्वागत केले. यावेळी माजी सरपंच विश्‍वासराव गर्जे, खरेदी विक्री संघाचे संचालक गंगाधर गर्जे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ ढाकणे, हबीब शेख, सोन्याबापू गर्जे, गणपत गर्जे, संभाजी गर्जे, कैलास गिरी, उपसरपंच नारायण पालवे मा. उपसरपंच उद्धव माने, संजय पालवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.