Breaking News

सकल शिवार आंदोळले, महाश्रमदानास उदंड जाहले!


पाथर्डी तालुक्यातील, तप्पा पिंपळगांव येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम नागरिक आमदार मोनिका राजळे यांच्यासहित तहसिलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांच्यासह शासकीय निमशासकीय कर्मचारी, भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या सर्वांनी साकारलेल्या महाश्रमदानामुळे तप्पा पिंपळगावचे सकल शिवार आंदोळले.

काल सकाळपासून या कार्यक्रमासाठी मोठी लगबग चालू होती. सर्वांच्या ठायी एक विलक्षण चैतन्य सळसळत होते. सर्वजण गावाकुसाला जमा झाले वाजत- गाजत नियोजित श्रमदानस्थळी दाखल झाले. आणि हजारो हात श्रमदानाला भिडले. 42 डिग्री सेल्सियस तापमानात, घामाच्या धारा पिंपळगावच्या शिवारात टपकून सार्थकी लागत होत्या. आणि पाहता-पाहता साडेतीन एकर पडीक जमिनीवर समतल चरांचे खोदकाम पार पडले. आमदार राजळेंनी पेटविलेल्या श्रमदानाच्या यज्ञाच्या धुळीचे लोट गगनाला भिडले. पाणीवाटप करणारे पाणी पुरवित होते, गाण्यांच्या तालासुरांत पिंपळगावच्या शिवारावर रोमांच उठत होते. आणि कृतार्थ झालेली भुई नभाला दान मागण्यासाठी सज्ज होत होती.

महाश्रमदानात देहभान हरपलेल्यांना जर उष्माघाताचा त्रास झालाच तर त्यासाठी रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. पाणी फौंडेशनचे प्रशिक्षक शहाजी शिंदे हा सोहळा पाहताना हरखून गेले. आजीचा दशक्रिया टाळून आश्‍विनी व अंकुश सामृत हे परगावचे दाम्पत्य श्रमदानात सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यातील वळू हे आश्‍विनी सामृतांचे माहेरचे गांव, पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवून सुजलाम् सुफलाम् झालेले असल्याने मोठ्या अभिमानाने त्या आपल्या माहेरचा इतिहास पिंपळगावच्या ग्रामस्थांना सांगून त्यांच्यात चैतन्य भरवित होत्या. सारा काही योगायोग विलक्षण जुळून आला होता.

चौकट:- दुपारच्या सत्रादरम्यान शहाजी शिंदे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या श्रमार्पित प्रवृत्तीला विशेत्वाने नावाजताना म्हणाले अशा लोकभावनेशी समर्पित लोकप्रतिनिधी मतदारसंघाला लाभणे हे या मतदारसंघाचे भाग्यच म्हणायला हवे. केवळ बातमीचा विषय होण्यापुरते श्रमदान करणारे अनेक लोकप्रतिनिधी मी पाहिले. परंतु उन्हाच्या कडाक्यात स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता ज्याया पद्धतीने त्यांनी आजवरच्या कामांत श्रमदान केले आहे, त्याची पाणी फौंडेशनने विशेषत्वाने दखल घेतली आहे. अशा लोकप्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राला लाभल्या तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.