राहुरी: मराठा समाजाची सध्याची दयनीय स्थिती लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन इतर मागास प्रवर्गात ( ओ. बी.सी.) मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात क्रांती सेनेच्यावतीने राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सर्जेराव निमसे यांना निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे, सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज अत्यंत मागासलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे. समाजातील जवळपास ८० % नागरिक ग्रामीण भागात राहतात. त्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक शेती, शेतमजुरी व इतर अंगमेहनतीची कामे करून स्वत:चा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांचे आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या सर्व कारणांमुळे मराठा समाजाची मुलांना शिक्षण देण्याइतपत आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही. बहुतांश स्त्रियांना शारिरीक श्रमाची कामे करावी लागतात. समाजाचे राहणीमान व सामाजिक जीवन दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाचे बनले आहे. मराठा समाज माहिती तंत्रज्ञान, संवाद व शासनाच्या इतर योजनेपासून आरक्षणाअभावी वंचित राहत चालला आहे. या निवेदनासोबत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीचे कोंढवड, शिलेगाव, हिरडगाव आदी ग्रामपंचायतीचे करण्यात आलेले ठरावही देण्यात आले.यावेळी क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, जिल्हाध्यक्ष जालिंदर शेडगे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, जिल्हा सल्लागार साहेबराव जाधव, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे, प्रशांत साबळे, कैलास दरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.