Breaking News

झोपडपट्ट्यांमधील सोयी, सुविधांवर जास्त लक्ष दयावे - अनुराधा गोरखे


पुणे, दि. 06, मे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतर प्रभागाच्या तुलनेने अधिक झोपडपट्ट्यांचा भाग हा अ प्रभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यात प्रभाग क्रमांक 10, 14, 15 आणि 19 यांचा समावेश असून गोर-गरीब नागरिकांच्या वस्त्या आहेत. तेथे पाणी, वीज आणि स्वच्छताविषयक चांगल्या सोयी, सुविधांवर अधिका-यांनी लक्ष द्यावे, अशा सुचना अ प्रभागाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी बैठकीत दिल्या. अ प्रभागाच्या कार्यालयात अनुराधा गोरखे यांनी प्रभागातीव स्थापत्य, विद्यूत, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर विभागांच्या अधिका-यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रामुख्याने विद्यानगर, दत्तनगर, लालटोपीनगर, रामनगर, इंदिरानगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर, भाटनगर या भागात लक्ष देण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. अनेक ठिकाणी पालिकेने हॉल बांधले आहेत, तेथे पालिकेने लक्ष घालून झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखान्याची सोय करून द्यावी. अनेक ठिकाणी विद्यूत खांब व तारांचा अवस्था बिकट आहे. त्यातून जीवाशी बेतणारा हा प्रकार असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपायोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याबरोबर झोपडपट्टी भागातील गटारांची दुर्दशा झाली आहे. हा आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याने बंदिस्त गटारे तातडीने करावीत. प्रभाग कार्यालयात महिला सफाई कर्मचा-यांसाठी स्वतंत्र कक्ष व स्वच्छतागृह बांधण्यात यावे. तसेच, अ प्रभागाच्या इमारतीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने लिफ्ट बसविण्यास परवानगी दिलेली आहे. तरीही लिफ्ट बसविली जात नसल्याने त्याची कार्यवाही तातडीने करून घेण्यास त्यांनी सांगितले.