Breaking News

बहुजन क्रांती मोर्चाची परिवर्तन यात्रा रोखल्याचा निषेध आंदोलन


राहुरी : मुंबई येथे दि. २१ मे रोजी पोलिस प्रशासनाने बहुजन क्रांती मोर्चाची परिवर्तन यात्रा अडवून ठेवली. या मनमानीच्या या राहुरी येथे आज {दि. २४} नायब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. 
नागपूर येथून दि. २४ एप्रिल रोजी सुरु झालेली परिवर्तन यात्रा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बहुजन समाजात जागृतीचे काम संविधानिक मार्गाने कायद्याचे पालन करत निघालेली आहे. २७ दिवस यात्रा सुरळीतपणे सुरु होती. परंतु परिवर्तन यात्रा मुंबईत दाखल होताच ऐनवेळी सुट्टीच्या दिवशी व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज पाठवून पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. फडणवीस सरकारच्या सांगण्यावरुन ही यात्रा अडवल्याची चर्चा होत आहे. पोलिसांच्या या अडमुठ्या धोरणांमुळे आमच्या मूलभूत (मौलिक) अधिकारांचे हनण झाले असून शासन-प्रशासन याद्वारे काय साध्य करु इच्छित आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, गुजरात राज्यात राजकोट येथे अनुसुचित जातीतील युवकाची मारहाण करुन हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून राहुरीचे नायब तहसिलदार गणेश तळेकर यांना तालुक्यातील परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे संजय संसारे, बहुजन मुक्ती पार्टिचे संतोष वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे, धनराज चंडाले, फिरोज शेख, इम्पाचे डॉ. रमेश गायकवाड, बागडे, डॉ. विजय मकासरे, अजय मकासरे, किरण मकासरे, सोन्याबापू मकासरे, संदेश मकासरे आदी उपस्थित होते.

सामाजिक सलोखा दूषित करण्याचे काम 

या यात्रेत कायदा सुव्यवस्थेचा सन्मान करत प्रबोधनात्मक जागृती केली जात होती. मात्र कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक? एक मात्र नक्की, बहुजन क्रांती मोर्चाप्रणित परिवर्तन यात्रा अडविणारेच राज्यात सामाजिक सलोखा दुषित करत आहेत. {संजय संसारे, भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष }