Breaking News

साईनाथ रुग्णालयात रुग्णांना आर्थिक भुर्दंड!


शिर्डी : येथील साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात मोफत औषधोपचार सुरु करण्यात आले आहेत. संस्थानचा हा उपक्रम सेवाभावी आहे. मात्र या रुग्णालयातील डॉक्टर लिहून देत असलेली अर्धीच औषधे मिळत आहेत. उर्वरित औषधे लगतच्या मेडिकलमधून विकत घ्या, असा सल्ला येथील डॉक्टर देत आहेत. त्यामुळे सेवेसाठी येथे येत असलेल्या रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 
साईसंस्थानने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. औषधोपचार व विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. तो खर्च सामान्य माणसाला न परवडणारा आहे. त्यामुळे साईसंस्थानच्या दोन्ही रुग्णालयामध्ये वर्षभरात लाखो लोक उपचार घेऊन साईबाबांच्या आशिर्वादाने बरे होतात. याचे श्रेय साईसंस्थानला आहे. येथील डॉक्टर रुग्ण, त्यांचे आजार आणि लागणारी औषधे आदींचा लेखाजोगा आणि माहिती संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देण्याची गरज असते. त्याधर्तीवर संस्थान औषध्ये खरेदी करत असते. अशा पद्धतीने संस्थानचे काम चालत असताना येथील डॉक्टर जी चिठ्ठी लिहून देतात, त्यातील अर्धी औषधे मिळतात आणि काही मिळत नाही, हा विरोधाभास कसा, हा सवाल उपस्थित होत आहे.

तात्काळ औषधे उपलब्ध करा!
या रुग्णालयात औषधोपचार मोफत मिळत असताना औषधे विकत दिली जातात. काही औषधे शिल्लक नाही, असे सांगितले जाते. डॉक्टर जी चिठ्ठी देतात, ती सर्व औषधे मिळायला हवी. ती जर मिळत नसतील आणि रुग्णालयाच्या कामकाळजात सुधारणा होणार नसेल तर शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करून विश्वस्त मंडळाला या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देऊ. 

संजय शिंदे, शिवसेना, शहराध्यक्ष, राहाता.