Breaking News

रमजानसह अधिक मासानिमित्त बाजारात तेजी


कर्जत : बाजारात आलेली मरगळ आता रमजान आणि अधिक मासामुळे दूर होण्याचे संकेत मिळत आहेत. आज जरी रवा, डालडा, तुपाला मागणी नसली तरी, येत्या काही दिवसात धोंडेवान देण्यासाठी या दोन्ही वस्तुंची मागणी वाढून त्यांचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. मुस्लिम बाधवांकडून रमजानचा उपवास सोडण्यासाठी पेंडखजुरला मोठे महत्व असल्याने त्याची किंमत 500 रू किलो पासुन 2 हजार रू किलो प्रर्यंतची पेंडखजुर बाजारात दाखल झाली आहे. बाजारात सध्या ग्राहकी सर्वसाधारण असल्याचे चित्र आहे. पोहे, तुरडाळीत तेजी असुन, पोहे तीन हजार 600 ते 4 हजार रूपये प्रतिक्विंटलरवर पोहचले आहेत. तूर डाळीचे भाव साडेपाच ते 6 हजार प्रति क्विंटल एवढे आहेत. सोन्याचा सरासरी भाव 31 हजार 300 रूपये तोळा एवढा असुन, तर चांदीमध्ये गेल्या आठवड्यात किलोमागे 500 रूपयांची वाढ झाली असून 40 हजार रूपये किलो असल्याचे सांगण्यात आले. सोने तसेच चांदी खरेदीला अधिक महिन्यानिमित्त बर्‍यापैकी ग्राहकी असल्याचे सांगण्यात आले.

गहू, ज्वारी, तूर, हरभर्‍याची आवक आजही बर्‍यापैकी आहे. कर्जत बाजार समितीत गव्हाची आवक ही 400 ते 500 पोती असुन सरासरी भाव 1700 ते 2200 रूपये प्रतिक्विंटल असे आहेत. तूरीची आवक ही बर्‍यापैकी असुन त्याचे भाव 3800 ते 4200 रूपये प्रति क्विटल होते. मुगडाळीतील तेजी कायम असुन 6 हजार ते 6 हजार 600 रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सरकी तेलाचे भाव 7 हजार 800 रूपये असल्याचे सांगण्यात आले.
कर्जत शहरासह तालुक्यात रमजानचा महिना अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. ईद अद्याप दूर असली तरी, त्याच्याखरेदीची लगबग आत्तापासुनच बाजारात दिसुन येते आहे. त्याचबरोबर रेडीमेड कपडे खरेदीला प्राधान्य देण्यात असल्याचे सागण्यात आले. दम्यान विविध प्रकारचे सुगंधी अत्तरानेही बाजारात सुगंध परसला आहे. हे अत्तर 70 रूपयांपासुन दोन हजार रूपयांपर्यंत विकले जातात.