Breaking News

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात प्रभारीराज असल्याने भ्रष्टाचार ? जवळपास 40 लाखांचा अपहार झाल्याची चर्चा


जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुका मतदारसंघात अशा घटना का घडतात? या पालकमंत्र्यांच्या जामखेड तालुक्यात संपुर्ण प्रभारीराज असून जामखेडच्या पंचायत समितीतील एका कर्मचार्‍याने मोठा भ्रष्टाचार केला आहे. येथे अधिकारी थांबायला तयारच नाहीत, कारण त्याला जबाबदार राम शिंदे आहेत. पालकमंत्री शिंदेंचा जामखेड तालुकाच का प्रभारीराज अशी चर्चा नागरिक मधून जोरदार होत आहे. जामखेड तालुक्यात अधिकार्‍यास कोणाचा धाकच राहिला नाही. गटविकास अधिकारी कायमस्वरूपी नसल्याने कोण काय करत आहे, कोणासही माहित नाही. जामखेड पंचायत समितीस जवळपास एक वर्ष होत आले तरी येथे गटविकास अधिकारी नाही, त्यामुळे बाकीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने याचा फायदा घेतला आहे. जामखेडची पंचायत समिती फक्त नागरिकांना देखावा म्हणून आहे. ग्रामीण भागामधील जनतेचे किंवा महिलेचे काय प्रश्‍न असतील तर अधिकारी नसल्याने त्या नागरिकास खाली हाताने परत गावाकडे जावे लागते. अशी बिकट परिस्थिती पालकमंत्र्यांच्या तालुक्यावर आली आहे. जामखेडला कोणी वाली आहे का असा प्रश्‍न वयोवृद्ध नागरिकांसह महिला करत आहेत. पंचायत समितितील एका कर्मचार्‍याने भ्रष्टाचार करून मयत सेवानिवृत्तधारकांची नावे बँकेला दाखवून त्यांची निवृत्ती पेन्शनची रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा करण्याचा गेली दीड वर्षापासुन सूरू असलेला प्रकार जामखेड पंचायत समितीमध्ये उघडकीस आला आहे. याची वाच्यता होताच संबधित कर्मचारी दोन दिवसापासून फरार झाला आहे. अपहार झालेली रक्कम अंदाजे चाळीस लाखाच्या घरात असल्याचे समजते. 
याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडुन लेखा व वित्त विभागांची त्रिसदस्यीय समिति पंचायत समितिमध्ये गुरुवारी दाखल झाली. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी विभागाला लावलेल्या सील तोडण्यास सांगून दोन वर्षांच्या कालखंडातील सर्व कागदपत्रे तयार करण्यास सांगितले. संबधित कर्मचार्‍याचे कागदपत्रे असलेले कपाटास सील असून, ते तसेच ठेवले आहे. 
पंचायत समितीकडुन अधिक माहिती घेतली असता जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितितील वेगवेगळ्या खात्यातील निवृत्त पेन्शनची संख्या 650 च्या आसपास आहे. या पेन्शनरांचे काम पाहण्यासाठी पंचायत समितित स्वतंत्र विभाग आहे. या सर्वांचे खाते सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक, प्राथमिक शिक्षक बँक व जिल्हा सहकारी बँक शाखा जामखेड अशा वेगवेगळ्या बँकेत आहेत. 
पंचायत समितीकडुन जिल्हा सहकारी बँकेत 450 च्या आसपास निवृत्त पेन्शनधारकांचे खाते आहेत, निवृत्तधारकांचे ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेस निवृत्त धारकांची यादी व चेक दिला जातो. परंतु सदर कर्मचारी हा एक्सेल यादीतील नावामध्ये फेरफार करून मयत असणार्‍या निवृत्त कर्मचार्‍यांचे नाव व रक्कम दाखवून त्यापुढे स्वतःचा खाते नंबर टाकत असत, त्यामुळे ही सर्व रक्कम संबंधित कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होत असे. प्रथमदर्शनी हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या नगर येथील अधिकार्‍यांना समजल्यानंतर त्यांनी जामखेड पंचायत समितीतील अधिकार्‍यांना सदर कर्मचार्‍याचे कपाट सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संजय छैलकर यांना सील करण्याचे आदेश दिले. त्यावरून त्यांनी दि. 9 रोजी सील ठोकले. 
त्यानंतर गुरूवारी (10) जिल्हा परिषदेच्या उपमुख्यलेखा व वित्त अधिकारी श्रीमती वराडे, सहाय्यक लेखा अधिकारी क्यातक व कुलकर्णी यांची त्रिसदस्यीय समिति दुपारी 12 वाजता जामखेड पंचायत समितीमध्ये दाखल झाली. यावेळी त्यांनी अर्थविभागाचे संपूर्ण रेकॉर्ड मागुन घेतल्यानंतर जवळपास तीन तास विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने दोन वर्षांतील सर्व निवृत्तधारकांचे सेवापुस्तके, बिले व्हाऊचर अशी कागदपत्रे शोधण्यास सांगितले याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 
पंचायत समिती या अपहार झालेल्या रकमेचा आकडा चाळीस लाखाच्या आसपास असला तरी तो वाढण्याची शक्यता आहे. कक्ष अधिकारी छैलकर हे संबधित कर्मचार्‍यांच्या घरी जाऊन आले. परंतु तो घरी अढळुन आला नाही. संबधित कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल होतो का नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.