Breaking News

समुद्रात पोहताना 3 पर्यटक बुडाले

रायगड - कोपर खैरणे येथील 3 जण साडेसाह वाजण्याच्या सुमारास नागाव समुद्र किनारी बुडाल्याची घटना घडली. या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक व पोलीस रात्रभर करत होते. मात्र, भरती असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत होती. आशिष मिश्रा, फहाद सिद्धीकी आणि चैतन्य सुळे अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी 26 मे’ला सकाळी आशिष मिश्रा आणि फहाद सिद्धीकी यांचा मृतदेह कोर्लई तर चैतन्य सुळे याचा मृतदेह आग्राव खाडी किनारी सापडले. कोपर खैरणे येथून 13 जणांचा ग्रुप 25 मे’ला अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारी फिरण्यास आला होता. सायंकाळी हे 13 जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. खोल समुद्रात पाण्याचा अदांज न आल्याने चैतन्य किरण सुळे (20), आशिष रामनारायम मिश्रा (20), व फहाद सिद्धीकी (21) हे तिघेजण बुडू लागले. यावेळी त्यांच्या सोबत असलेला प्रज्योत नारायण पिंजारी (21) याने मदतीसाठी आरडा-ओरड करून स्थानिकांना व समुद्रावर असणार्‍या जीवरक्षकांना बोलावले. मात्र, भरतीची वेळ असल्याने तिघेही समुद्रात वाहून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी या तिघांची शोध मोहीम सुरू केली. यासाठी कोळी बांधवांची मदत घेण्यात आली. मात्र, रात्रभर शोधूनही या तिघांचा शोध लागला नाही. आज सकाळी ओहटीच्या वेळी दोघांचे कोर्लई व एकाचा मृतदेह आग्राव या खाडी किनारी आढळून आला. तिघांचे मृतदेह पोलिसांनी रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांकडे सुपूर्द केले.