Breaking News

ठाण्यात 30 तारखेला रंगणार भारत-नेपाळ खो-खो सामना !


मुंबई, दि. 27, मे - भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने भारत - नेपाळ आंतरराष्ट्रीय खो-खो मालिकेच्या सामन्याचे व ’एक भारत श्रेष्ठ भारत’ स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या विद्यमाने बुधवार 30 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शाहिर दामोदर विटावकर क्रीडानगरी (प-याचे मैदान), विटावा कोळीवाडा, कळवा, ठाणे येथे स्थानिक आमदार व माजी मंत्री मा. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या यजमानपदाखाली करण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या क्रीडा व युवक मंत्रालयाच्या वतीने विविध राज्यातील क्रीडासंस्कृतीच्या आदानप्रदानास चालना देण्यासाठी प्रथमच ’एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पने अंतर्गत खो-खो स्पर्धेचे आयोजन भारतभर करण्यात येत आहे. या स्पर्धेत दोन राज्यांचा मिळून एक संयुक्त संघ असे देशातील 32 राज्यांचे पुरूष व महिलांचे 16 संघ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र व ओडीशा या राज्यांच्या संयुक्त पुरूष व महिला संघांचे सामने पाँडेचेरी व दिव-दमण च्या संयुक्त संघाबरोबर होणार असून या सामन्यांतील विजेतेसंघ रांची येथे होणा-या या स्पर्धेच्या पुढील फेरीकरिता पात्र होतील. 

खो-खो खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचार व प्रसारासाठी सध्या भारत व नेपाळ या देशांच्या संघादरम्यान पाच सामन्यांची मालिका सुरू असून फरिदबाद, अजमेर, इंदौर नंतर चौथ्या सामन्याचे आयोजन करण्याचा मान ठाण्यास मिळाला आहे. मालिकेतील पाचवा सामना पाटणा,बिहार येथे होईल. भारत-नेपाळ खो-खो सामान्यांच्या मलिकेतील चौथ्या सामन्याकरीता भारतीय पुरूष संघात महाराष्ट्राच्या पियुष घोलम, अक्षय भांगरे, संकेत कदम, सुयश गरगटे, सुरेश सावंत, कृष्णन राठोड यांची निवड झाली असून संघाच्या प्रशिक्षणाची धुरा महाराष्ट्राचे गोविंद शर्मा सांभाळतील तर प्रशांत इनामदार संघाचे व्यवस्थापक असतील. ’एक भारत श्रेष्ठ भारत’ व भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आयोजनाची तयारी ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब, राज्य संघटनेचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कमलाकर कोळी, तुषार सुर्वे व निशिकांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.