Breaking News

मान्सूनचे 29 मे रोजी केरळमध्ये आगमन हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली - दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून तीन दिवसांच्या आधीच केरळमध्ये धडकणार आहे. 29 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचे आगमन 29 तारखेला चार दिवसांच्या मागे किंवा पुढे असण्याच्या शक्यतेसह होणार आहे. मान्सून जसजसा उत्तरेकडे सरकत जाईल, तसतशी वातावरणातील उष्णता कमी होऊन उकाड्यापासून आराम मिळेल. भारताच्या हवामान विभागातर्फे मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्ष 2005 पासून लावण्यात येत आहे. वर्ष 2015 वगळता मागील 13 वर्षात लावलेले सर्व अंदाज खरे ठरले आहेत. यावर्षीचा मान्सून सामान्य असेल असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता 42 टक्के आहे, तर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के आहे. येत्या तीन-चार दिवसात उत्तर आणि पश्‍चिम भारतात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. 

दरम्यान, मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच बळीराजाचीही लगभग सुरु होणार आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणं महत्त्वाचं असेल.