Breaking News

औरंगाबाद हिसांचारात दोन ठार जाळपोळीसह तुफान दगडफेक ; 10 पोलीस जखमी

औरंगाबाद : मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले. तलवारी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह हल्ला करत जमावाने तुफान दगडफेक केली. यात पोलिसांसह नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत.दोन्ही गटांनी दिसेल ती वाहने, दुकाने पेटवून दिली. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गोर्वधन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलिसांचा समावेश आहे. 

महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरूवारपासून सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसर्‍या एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरून मनपाच्या अधिकार्‍यांनी त्याही धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन शुक्रवारी तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास भिडले. त्यातील एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात दुकानाबाहेर असणार्‍या कुलरसह इतर सामानांची, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरू केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील 7 ते 8 हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या 3 गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.


मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : विखे पाटील
औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळेच शहराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्‍नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.