Breaking News

दखल - मोदीजींच्या शंका रोगावर उपचार !

जगाच्या पाठीवर सर्वात मोठी लोकशाही नांदवणार्‍या देशाचा पंतप्रधान कसा असावा? शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय ठरू शकतो. विद्यार्थी दशेतील मानसिकता या विषयाला न्याय देताना गेल्या साठ वर्षातील स्वतंत्र भारताचा विकास आणि विद्यमान पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी गेले तीन चार वर्ष भारतभ्रमणसह वैश्‍विक भ्रमंती दरम्यान वाजवलेली रेकार्ड यांचा तुलनात्मक ताळेबंद मांडेल आणि या देशाचा पंतप्रधान संकूचित बुध्दीचा खोटारडा नसावा. श्रेयाचा बाजार मांडणारा नसावा हा निष्कर्ष नक्की काढेल. आणि यातून मोदी यांना सतत त्रस्त करीत असलेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केले? या शंका रोगावरही खरेखुरे उपचार होतील.
..........................................................................................................................................
साठ साल में काँग्रेसने देश को लुटकर खाया। देशको विदेशीयोंके पास गिरवी रखा! देश मे मूलभूत सुविधा देने मे काँग्रेस असफल रही, उसका प्रमुख कारण है भ्रष्टाचार, सारे काँग्रेसी भ्रष्टाचार मे लिप्त है, गाँधी नेहरू घराणेने देश को बरबाद किया है! आपले पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे गेले तीन वर्ष हीच रेकार्ड देश विदेशात वाजवत आहेत. नरेंद्र मोदीजींचे हे भाषण ऐकल्यानंतर आपल्या पंतप्रधानांना काँग्रेस फोबीयाने पछाडले आहे. साठ वर्षांत काँग्रेसने काय केले या शंका रोगाने मोदी त्रस्त असून या रोगावर उपचार करण्यासाठी विदेशात प्रचलित असलेल्या वैद्यक शास्राची मदत घेण्याची गरज नाही. या रोगावर भारतीय शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मानसिकता योग्य उपचार करू शकते. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, मोदी काँग्रेससंदर्भात विशेषतः काँग्रेसच्या साठ वर्षातील कारभाराबाबत करीत असलेल्या अपप्रचाने देशाची केवळ करमणूक होत आहे. पंतप्रधान होण्याआधी आणि शपथविधीनंतर काही दिवस देशाला पंतप्रधानांचे ते बोल बरे वाटत होते, त्यानंतर मात्र त्यांच्या त्या रेकार्ड भाषणात नवा मसाला नसल्याने ऐकून ऐकून चोथा झाला अशी सहज प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
देशाच्या पंतप्रधानाने देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने आपल्या जिभेवर नियंञण ठेवायला हवे. भान सोडून केलेले वक्तव्य पंतप्रधानासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही. आणि एखाद्याचे कर्तृत्व वारंवार खोटे बोलून नाकारता येत नाही. देशाच्या प्रगतीबाबत बोलायचे झाले तर या देशाची सव्वाशे करोड जनतेला माहित असलेले वास्तव नाकारणारे पंतप्रधान किती खरे किती खोटे याचा हिशेब जनता आता करू लागली आहे. आम्ही काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहोत. मात्र वास्तव लपविले जात असेल, नाकारले जात असेल तर या खोटारड्या प्रवृत्तींना वास्तव दाखवून भानावर आणणे भारतीय नागरिक म्हणून प्रथम कर्तव्य आहे. मोदी म्हणतात, साठ वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही. मोदीजी! आपण ज्या देशाचे पंतप्रधान आहात, तो भारत देश तीनशे वर्ष परकीय सत्तेचा गुलाम होता. ज्या दिवशी या भारताची सत्ता इंग्रजांनी काँग्रेसच्या हातात सोपविली तेव्हा काय अवस्था होती या देशाची? अवघे चार विमाने, वीस टँक. भारतीय सीमेवर अवघे काही हजार जवान. सुई तयार करण्याची क्षमता होती का आपल्या अर्थव्यवस्थेत? तिजोरी रिकामी होती. अवघ्या पन्नास गावात वीज पोहचलेली होती. देशभरात केवळ दहा धरणे होती. राजा राजवाड्यांच्या वादात हा देश पोखरला होता. दुरभाष्य सुविधा मोजकी होती. या साठ वर्षात काय काय झाले? ज्या सोयी सुविधा तुम्ही उपभोगत आहात, जे तंत्रज्ञान वापरून आपण पंतप्रधान झालात ते तंत्रज्ञान याच काँग्रेसची देणगी आहे. या साठ वर्षात अणुक्रांती केली काँग्रेसने. हजारो धरणे बांधली काँग्रेसने. गावागावात वाड्यापाड्यांवर वस्तीवर वीज पोहचवली, लाखो किमीचे रस्ते बांधले काँग्रेसने. आयआयटी, माहिती तंत्रज्ञान संस्था, अवकाश अभ्यास संस्था, सीमेवर लाखो जवान, लाहोरपर्यंत धडक मारून एक लाख पाकिस्तान सैनिकांसह कमांडर्सला भारताच्या पायाशी लोळण घ्यायला लावले काँग्रेसने. पायलट प्रोजेक्ट राबवून दोनदा हरित आणि श्‍वेतक्रांती करून या देशाला स्वावलंबी केले काँग्रेसने. पाकिस्तानचे दोन तुकडे केले काँग्रेसने. पोर्तूगाली सत्तेच्या गोवा बाहेर काढला काँग्रेसने. राजेशाही संस्थाने खालसा केली काँग्रेसने. जोखडातूनसामान्य माणसाला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण केले काँग्रेसने. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोदीजी! आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत होता त्या दिवसापर्यंत हा देश सर्वाधिक विदेशी मुद्रा असलेला जगातील दहावा देश होता तोही काँग्रेसच्या कर्तृत्वामुळे.
अगदी झोपडीत दुरदर्शनचा पडदा पोहचविण्याचे काम काँग्रेसने केले. आज प्रत्येकाच्या हातात दिसणारा मोबाईल आणि सर्व सरकारी खासगी, व्यक्तीगत क्षेत्रात दिसणारी संगणक प्रणाली काँग्रेस धोरणाची फलश्रूती आहे. आणि हो! आपण अत्याधुनिक तंञज्ञान वापरून देशाला वेड्यात काढत आहात ना तेही काँग्रेसच्या दुरदृष्टीमुळे. तो पायाही काँग्रेसनेच घातला. किती कृतघ्न व्हाल मोदीजी?आज हे वास्तव प्रत्येकाच्या लक्षात आल्याने सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून निखळ करमणूक करून घ्यायची एव्हढाच उद्देश भारतीयांच्या नजरेसमोर आहे. अगदी शालेय आणि महाविद्यालयीन तरूणांची मानसिकता देखील हीच आहे.